परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण ‘ड्राईव्ह’ : महापौर मोहोळ

शनिवार, 29 मे 2021 (21:26 IST)
पुणे शहरातून शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
 
ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश परदेशात निश्चित झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून महापौर मोहोळ यांच्या पुढाकारातून लसीकरण ड्राईव्ह राबविण्यात येत आहे.
 
याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात हा विशेष ड्राईव्ह राबविण्यात येत असून नोंदणी न करता थेट ‘वॉक इन’ पध्दतीने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.
 
यासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले असून सकाळी १० ते ५ या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लस उपलब्ध होईल. यासाठी लसीकरणावेळी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश निश्चित झाल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक असेल’.
 
‘विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर हा ड्राईव्ह संपूर्ण आठवडाभर राबवण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदम गर्दी करु नये. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रवेश निश्चित होऊनही केवळ लसीकरणासाठी विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण होऊ नये, या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला आहे. याचा विद्यार्थ्यांना फायदा घ्यावा आणि लसीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही महापौर मोहोळ यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती