राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांचा साप्ताहिक सरासरी दर जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेले गृहविलगीकरणाची सुविधा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने खालावली आहे. दररोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढली आहे.
शहरात पहिल्या लाटेत लहान घरे असलेली वस्ती भागातील किंवा झोपडपट्टीतील नागरिकांची संख्या जास्त होती, त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू केले होते. पण दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये सोसायटी, बंगल्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने गृहविलगीकरणावर जास्त भर दिला होता. असे असतानाच राज्यापेक्षा कोरोना बाधितांची सरासरी जास्त आहे अशा १८ जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करून, त्याऐवजी संस्थात्मक विलगीकरण सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात गोंधळ उडाला आणि राजकारणही तापले होते. त्यानंतर राज्य शासनाने पुणेसह पिंपरी-चिंचवडमध्ये होम आयसोलेशन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.