पोलीस भरतीसाठी मुलीला पुण्यात घेऊन आलेल्या पित्याचा दुर्दैवी अंत

मंगळवार, 14 मार्च 2023 (08:44 IST)
पुणे :नाशिकहून मुलीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या पित्याचा रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. सुरेश सखाराम गवळी (55, रा. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे.
 
सध्या पोलिस भरतीसाठी राज्यातील विविध भागातून तरूण-तरूणी त्यांच्या पालक आणि मित्रांसोबत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या ग्राऊंडवर मोठय़ा संख्येने येत आहेत. सोमवारी सकाळी पोलीस भरतीसाठी मुख्यालयाच्या ग्राऊंडवर मुलीला सोडून चहा पिण्यासाठी, रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने सुरेश गवळी यांचा जागीच मृत्यू झाला.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकचे रहिवाशी असलेले सुरेश गवळी हे रिक्षाचालक म्हणून काम करत होते. पत्नी आणि 22 वषीय मुलीला घेऊन ते रविवारी रात्री दहा वाजता पुण्यातील शिवाजीनगर भागात आले होते. पुण्यात त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर फुटपाथवर कुटुंबियांसह रात्री काढली. सोमवारी भरतीसाठी त्यांच्या मुलीची ग्राऊंड परीक्षा होती. पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलीला पोलीस ग्राऊंडच्या गेटवर सोडले आणि ते पत्नीला सांगून जवळच चहा पिण्यासाठी निघाले. तेथून काही अंतरावर पायी चालत गेल्यानंतर रस्ता ओलांडताना अनोळखी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळय़ात पडले. त्यांची पत्नी रेश्मा याकाही अंतरावर असल्याने त्यांनी अपघात झाल्याचे पाहिले आणि त्या तात्काळ घटनास्थळी पोहचल्या. मात्र, गवळी यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविचछेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती