पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची रात्र रस्त्यावर

शनिवार, 4 मार्च 2023 (07:54 IST)
पोलीस भरतीसाठी राज्यभरातून हजारो उमेदवार मुंबईत दाखल झाले आहेत. सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मैदानावर पोलीस भरतीसाठी गुरुवारी मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. मात्र, भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सुरक्षेचे कारण पुढे करीत मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संकुलाच्या आवारात वास्तव्यास मनाई केली. परिणामी, या उमेदवारांना बुधवारची रात्र रस्त्यावरच काढवी लागली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर, पदपथावर, तसेच पुलाखाली शेकडो उमेदवार रात्री मुक्कामी होते.
 
सत्ताधाऱ्यांनी वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित केलेल्या राजकीय सभांच्या वेळी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती; परंतु पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आसरा दिला जात नाही. या परिसरात मोठय़ा प्रमाणात गाडय़ांची वर्दळ असते. यामुळे रात्री अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करीत सर्वच स्तरांतून मुंबई विद्यापीठ प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती