तळीये गावाचा समावेश हा कधीच दरड कोसळणाऱ्या गावांच्या यादीत नव्हता

शनिवार, 24 जुलै 2021 (15:39 IST)
तळीये गावाचा समावेश हा कधीच दरड कोसळणाऱ्या अशा दरड प्रवण गावांच्या यादीत नव्हता.त्यामुळे तळीये गावावर आलेले संकट हे महाडमध्ये आलेल्या अतिपुरामुळेच आले.त्याठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी होते की मदत कार्य पोहचवण्यासाठीही अनेक अडचणी येत होत्या. प्रत्यक्षात हेलिकॉप्टरमध्ये मदत पोहचवतानाही हेलिकॉप्टर लॅण्डिंगसाठीही जागा नव्हती अशी माहिती अजित पवार यांनी दिली.पुण्यात आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.अपेक्षेपेक्षा जास्त पाणी आल्यानेच याठिकाणी बचावकार्य पोहचवण्यात अनेक अडचणी आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
 
त्याठिकाणचे स्थानिक आमदार यांनी कोकलेन आणि जेसीबीच्या मदतीने त्याठिकाणी रस्ता करून दिला. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेतेही त्याच रस्त्याने जाऊ शकले अशी माहिती अजितदादा यांनी दिली. हेलिकॉप्टरने मदत पोहचवताना अनेक तास हेलिकॉप्टर लॅण्डिंगसाठी जागा शोधत होते. पण बऱ्याच ठिकाणी मात्र दलदल असल्यानेच त्याठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या वर्षात महाडच्या तळीये गावाचे नाव कधीच दरड प्रवण असलेल्या गावांच्या यादीत नव्हते. पण पहिल्यांदाच असे घडले की याठिकाणी महाडमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील वृष्टीमुळेच याठिकाणी परिस्थिती बदलत गेली. मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानेच याठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती