पुण्यातल्या मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता (५६) यांचं आज निधन झालं. त्यांच्यावर पूना हॉस्पिटल इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हळूहळू अवयव निकामी होत गेल्याने त्यांचं निधन झालं. गेल्या १५ दिवसांपासून मेहता हे पुण्यातल्या पूना हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनसाठी उपचार घेत होते. मात्र अवयव निकामी होत असल्याने त्यांना दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
प्रकाशन व्यवसायामध्ये आधुनिकीकरणासाठी पावल उचलण्यामध्ये त्यांचे नाव अग्रेसर होते. सध्याच्या पिढीतील अनेक ख्यातनाम व्यावसायिकांना मेहता पब्लिकेशनच्या माध्यमातून ओळख मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. समाजातील अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या लेखकांना लिहित करण्यासाठी या संस्थेने संधी दिली. त्यामुळेच अनेक दर्जेदार साहित्याची निर्मिती करणारे लेखक घडवण्याचे श्रेय या संस्थेकडे जाते. अनेक लेखकांना संधी देऊन दर्जेदार साहित्य घडवण्याचे काम मेहतांच्या नेतृत्वात झाले. वाचकांना समृद्ध करणारा प्रकाशक म्हणून त्यांची ओळख होती. मेहता पब्लिकेशनची पुस्तके ऑनलाईन पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.