पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर
गुरूवार, 21 मार्च 2024 (08:06 IST)
पुण्यातील एका प्रसिद्ध हॉस्टेलमध्ये एका तरुणीने जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर या घटनेमुळे भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण पुण्यामधील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात रेणुका बालाजी साळुंके (वय वर्ष 19) ही तरुणी शिकण्यास होती. याच महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्येही ही तरुणी राहात देखील होती. मात्र, तिला या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्ये तिची रुममेट असणाऱ्या मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय वर्ष 19) यांच्याकडून सातत्याने त्रास देण्यात येत होता.
याच त्रासाला कंटाळून रेणुका ही नैराश्यात गेली होती. ज्यानंतर तिने या त्रासाला कंटाळून तिने 7 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास होस्टेलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , गेल्या काही महिन्यांपासून या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि हॉस्टेलमध्ये तिची रुममेट असणाऱ्या मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू या दोघांकडून तिला मानसिक त्रास देण्यात येत होता. आरोपी सतीश जाधव हा या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये काम करतो. तो तिला सतत आय लव यू असे मेसेज करीत होता. तसेच तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले? अशी येता जाता विचारणा करायचा. या प्रकारांमुळे ती घाबरलेली होती.
यासोबतच तिच्या खोलीमध्ये राहणारी मुस्कान सिद्धू ही तिला सतत त्रास द्यायची. तिच्या अभ्यासात व्यत्यय आणायची. ती अभ्यासाला बसली की खोलीमधील दिवे बंद करायची. या दोघांकडून सतत होणाऱ्या त्रासामुळे रेणुका नैराश्यात गेली होती. ज्यामुळे या सततच्या त्रासाला कंटाळून रेणुकाने 7 मार्चला टोकाचे पाऊल उटलले.
7 तारखेला रेणुका साळुंके हिने पेटवून घेतल्यानंतर तिला तत्काळ सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा काल मंगळवारी (ता. 19 मार्च) दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी आता आरोपी सतीश जाधव आणि मुस्कान सिद्धू या दोघांवर भादवि 354, 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, बालाजी धोंडीबा साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा तावडे यांच्याकडून करण्यात येत आहे.