पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात, तूर्त लॉकडाऊन नको : महापौर

बुधवार, 24 मार्च 2021 (09:40 IST)
पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे पुण्यात तूर्त लॉकडाऊन व्यवहार्य ठरणार नाही, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे. राज्यभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात लॉकडाऊन करण्याचे संकेत आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मोहोळ यांनी पुण्यात सध्या लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगितले.
 
महापौर मोहोळ म्हणाले, टाटा समाजशास्त्र संस्था आणि ‘आयसर’ ने केलेल्या अभ्यासातही पूर्णतः लॉकडाऊन ऐवजी निर्बंध वाढवावेत, असं सुचवलं आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी सध्या लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी हाच उपाय आहे. लॉकडाऊन हा मार्ग नाही. तसेच अधिकचे निर्बंधही लागू करता येतील, याचाहि विचार सुरु आहे.
 
आताच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, टेस्टिंग वाढवणे आणि लसीकरण व्यापक स्वरूपात करणे यावर वेगाने काम सुरु आहे. त्यामुळे पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा आणखी कडक नवे निर्बंध लावता येतील का? यावर चर्चा अपेक्षित असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती