हनुमान जन्मोत्सवा निमित्त राज ठाकरेंनी पुण्यात केली महाआरती

रविवार, 17 एप्रिल 2022 (10:02 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त ठिकठिकाणी 'महा आरती'चे आयोजन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 'सर्व धर्म' हनुमान जयंतीसह इफ्तार मेजवानीचे आयोजन केले होते.
 
या महिन्याच्या सुरुवातीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या दोन सभांमध्ये मशिदींमधून लाऊडस्पीकर न काढल्यास या धार्मिक स्थळांसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसाचे पठण केले जाईल, असा इशारा दिला होता. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला त्यांच्या मागणीवर 3 मेपूर्वी कार्यवाही करण्याचा अल्टिमेटमही दिला आहे.
 
पांढरा-कुर्ता पायजमा परिधान केलेले आणि भगवी शाल परिधान केलेल्या राज ठाकरे यांनी शनिवारी संध्याकाळी पुण्यातील सर्वात जुने समजल्या जाणाऱ्या खालकर आळी हनुमान मंदिरात हनुमानाची आरती केली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे युनिटने कर्वे नगर येथील मंदिरात सर्वधर्मीय हनुमान जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते या मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी भगवान हनुमानाची आरती केली. यासोबतच मंदिर परिसरात इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते.
 
यावेळी बोलताना पवार म्हणाले, भारत हा असा देश आहे जिथे विविधतेत एकता दिसून येते आणि सर्व धर्म, प्रांत, जातीचे लोक एकत्र राहतात आणि एकमेकांचे सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. इतर कोणत्याही धर्माचा द्वेष करणे ही भारताची संस्कृती नाही.
 
दरम्यान, मध्य मुंबईतील दादर आणि गिरगावातील हनुमान मंदिरात शिवसेनेने आरती केली. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील वरळी येथील मंदिरांना भेटी दिल्या आणि गिरगाव मंदिराच्या महाआरतीत भाग घेतला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती