हनुमान जयंती: राज ठाकरेंचं हनुमान चालिसा पठण, शिवसेनेकडून महाआरतीद्वारे प्रत्युत्तर

शनिवार, 16 एप्रिल 2022 (21:25 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते हनुमान जयंतीच्या निमित्ताने पुण्यात महाआरती करण्यात आली. यानंतर हनुमान चालिसा पठणही करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्यात कालच पोहोचले होते.
 
दुसरीकडे मंत्री आदित्य ठाकरे यांनी लवकरच अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं. दादरमध्ये शिवसेनेकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
 
मशिदीवरील भोंगे न हटवल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा राज यांनी गुढीपाडव्याला केलेल्या भाषणात दिला होता. त्यावरून राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापलं होतं.
 
पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती झाली. भोंग्यांविरोधी आंदोलनाची ही नांदी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मनसेने पुण्यात लावलेल्या पोस्टरवर राज ठाकरे यांचा उल्लेख 'हिंदुजननायक' असा करण्यात आला आहे.
 
3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. राज ठाकरे एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात वक्तव्य विधानं शरद पवार यांनी करत मनसेच्या थेट वर्मावर बोट ठेवलं होतं.
ठाण्यातील उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, शरद पवार, एसटी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर टीका केली होती. भाषणात राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि विशेषत्वाने शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.
 
पाच वर्षांनी रंग बदलून हिंदुत्व बदलत नाही. हिंदुत्व आमच्या मनात आणि रक्तात आहे असा टोला मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. यावेळी आदित्य यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. मे महिन्याच्या सुरुवातीला अयोध्येला जाणार असल्याचं ते म्हणाले.
 
हनुमान चालीसा पठणावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचणारच असा निर्धार या दांपत्याने व्यक्त केला.
 
दरम्यान न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदीवरील भोंगे उतरवा असं कुठेही म्हटलेलं नाही असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. न्यायालयाने रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनीक्षेपकांना बंदी घातली आहे. ज्या मशिदींनी, मंदिरांनी परवानगी घेतली आहे आणि कायद्याचं पालन करत आहेत तेथील लाऊडस्पीकर काढण्याचा प्रश्नच येत नाही असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती