पुणे शहरात प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक

शनिवार, 15 मे 2021 (08:33 IST)
पुणे, पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढले होते. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत आता महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला पुणे शहरात प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली आहे. 
 
पुणे महापालिका प्रशासनाने याबाबतचा नवीन आदेश काढला आहे. या आदेशात नमूद केल्याप्रमाणे  महाराष्ट्राबाहेरील राज्यातून पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही वाहतुकीच्या साधनामार्फत प्रवेश करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना पालिका क्षेत्रात येण्यापूर्वी ४८ तास वैधता असणारे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहणार आहे. 
 
राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणार्‍यांसाठी डिजिटल पासची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे पासासाठी अर्ज केल्यानंतर अर्जाची संख्येनुसार तो २४ तासाच्या आत मंजूर होतो. आत्तापर्यंत लाखांवर नागरिकांनी ई पाससाठी अर्ज केला आहे. जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे ई पास आवश्यक आहे. जिल्ह्याच्या शहराच्या सीमेवर तुम्हाला अडविल्यास व तेथे तुमच्याकडे ई पास नसल्यास तेथून तुम्हाला परत माघारी पाठविले जाऊ शकते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती