स्वतःला भाई समजून दहशत निर्माण करणारा सराईत गुंड महेश उर्फ बंटी प्रकाश पवार आणि त्याच्या साथीदारांवर पुन्हा एकदा मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. 2015 साली त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. परंतु 2019 साली बाहेर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा गंभीर गुन्हे केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बंटी पवार हा सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुकाई नगर येथे राहतो. त्याने त्याच्या साथीदारांसह खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, जबरी चोरी,अपहरण,बलात्कार,बेकायदेशीर शस्त्र जवळ ठेवणे,दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे मागील काळात केले होते. त्यामुळे 2015 मध्ये त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. 2019 मध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर स्वतःचे अस्तित्व लपवून राहू लागला.
तसेच वरील आरोपींना सोबत घेऊन त्याने पुन्हा गंभीर गुन्हे करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा त्याला अटक करून येरवडा तुरुंगात रवानगी केली होती. परंतु कोरोना प्रादुर्भावाचा फायदा घेत न्यायालयातून तात्पुरत्या जामीनावर तो जानेवारी 2020 मध्ये येरवडा जेलमधून बाहेर आला होता.यानंतर त्याने वरील दोन आरोपींच्या मदतीने गांजा विक्री करण्यास सुरुवात केली होती. 20 जून रोजी सिंहगड पोलिसांनी पाच लाखाच्या गांजासह आरोपींना पकडले होते. अधिक तपासामध्ये बंटी पवार याने इतर आरोपींना सोबत घेऊन व्यवसाय सुरू केले असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यामुळे या आरोपींवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास गवारे यांनी पोलीस उपायुक्त पूर्णिमा गायकवाड यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर या आरोपींची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर संजय शिंदे यांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे.ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी केली.