शहरातील गुन्हेगारांचे कंबर बोडीत काढताना पुण्यातील गुन्हेगारीला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक दणका देण्यात आला आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अली अकबर हुसेन इराणी (वय-30) आणि हैदरअली अब्बासअली सिया (वय-30 दोघे रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, इराणी वस्ती पुणे) यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
रस्त्याने पायी जाणाऱ्या 62 वर्षाच्या महिलेला मारहाण करुन गळ्यातून सोन्याचे दागिने हिसकावून नेले होते. ही घटना 18 जानेवारी 2021 रोजी पाषाण सुस रोडवर रात्री साडे आठच्या सुमारास घडली होती. ज्येष्ठ महिला प्रेस्टीज सोसायटी समोरुन जात असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी महिलेला अडवून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावुन नेली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस करत असताना पोलिस अंमलादर प्रशांत गायकवाड यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे सखोल तपास केला असता त्यांनी महिलेला मारहाण करुन दागिने चोरल्याची कबुली दिली. तसेच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील 4 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 85 ग्रॅम वजानाचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच गुन्ह्यात वापरलेली यामहा दुचाकी जप्त केली.
अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न व फसवणुक असे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी अली अकबर हुसेन याने टोळी बनवून गुन्हे केले असून तो टोळीचा म्होरक्या आहे. टोळीने अनेक गंभीर गुन्हे केले असून त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी यांनी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडके यांच्या मार्फत गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्याकडे सादर केला होता. अशोक मोराळे यांनी प्रस्तावाल मंजूरी दिली.