उधार दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून एकाचा कुऱ्हाडीने खून

गुरूवार, 7 एप्रिल 2022 (14:53 IST)
पुणे उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
 
पुण्यात हडपसर फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
 
युवराज बाबुराव जाधव (३४) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बाबुराव माणिक जाधव(55) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (३५,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. संशयित हा सराईत गुन्हेगार आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी यांची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर संशयित गणेश हा मिळेल तशी मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून २० हजार रुपये हात उसणे घेतले होते. युवराज हा गणेशकडे सातत्याने हात उसणे दिलेले पैसे मागत होता. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराज याच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला.
 
याचा राग आल्याने गणेशने जवळील कुऱ्हाडीने युवराजच्या डोक्‍यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्‍यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती