शहरातील रक्त पिशव्यांचा तुटवडा लक्षात घेता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वाढदिवसदिनी रक्तदान महासंकल्प दिवस आयोजित करत पुणेकरांना रक्तदान करुन शुभेच्छा देण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या या आवाहनावर रक्तदानासाठी पुणेकर एकवटल्याचे चित्र दिसले. वाढदिवसदिनी दिवसभरात तब्बल 3 हजार 860 रक्तदात्यांनी महापौरांना रक्तदानरुपी शुभेच्छा दिल्या.
यावेळी या शिबिराला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह नगरसेवक, भाजप पक्षपदाधिकारी, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
रक्तदानाच्या आवाहनाला पुणेकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ म्हणाले, पुणेकर एकत्र आले तर काय करु शकतात, हे कोरोना संकटाचा सामना करताना दिसून आले होते. सद्यस्थितीत शहरात रक्ताचा तुटवडा असताना पुणेकरांनी रक्तदानासाठी दाखवलेली एकजूट समाधान देणारी होती.
तब्बल 3 हजार 800 पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदानरुपी दिलेल्या शुभेच्छा नजीकच्या गरजूंना जीवनदान देणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. रक्तदान करणाऱ्या सर्व पुणेकरांचा मी ऋणी आहे. अनेकांना इच्छा असूनही वैद्यकीय कारणांनी रक्तदान करता आले नाही. त्यांनी प्रत्यक्ष उपक्रमाला भेट देऊन दिलेल्या शुभेच्छाही महत्त्वाच्या होत्या, असेही ते म्हणाले.
शिबिराच्या आयोजनाबद्दल माहिती देताना संस्कृती प्रतिष्ठानचे सचिव निलेश कोंढाळकर म्हणाले, रक्तदानाच्या आवाहनानंतर रक्तदात्यांचा प्रतिसाद लक्षात घेता रक्तपेढ्यांची संख्या 19 पर्यंत वाढवण्यात आली. रक्तदान प्रक्रियेत सुलभता ठेऊन कमी वेळात जास्तीत जास्त दात्यांना सहभागी होता येईल, अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले. त्यामुळेच दात्यांची संख्या 3 हजार 800 पेक्षा जास्त झाली
लेकीसह महापौरांकडून रक्तदान!
रक्तदान शिबिराची सुरुवात महापौर मुरलीधर मोहोळ यांची कन्या सिद्धी हिच्या आणि स्वतः महापौरांच्या रक्तदानाने करण्यात आली. त्यानंतर दिवसभर रक्तदात्यांनी रक्तदान करत महापौरांना शुभेच्छा दिल्या. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या रक्तदानाची सांगता रात्री १०:३० वाजता करण्यात आली.