गेल्या वर्षी मे महिन्यात पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्श अपघातात मोठा ट्विस्ट आला आहे. या अपघातातील मुख्य आरोपी 17 वर्षाचा असून अल्पवयीन आहे. आरोपीवर बाल न्याय कायद्यांअंतर्गत खटला चालवला जाणार असा निर्णय बाल न्याय मंडळाने मंगळवारी दिला. पुणे पोलिसांची याचिका बाल न्याय मंडळाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत आरोपीला प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणात 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार ने दुचाकीवरून जात असलेल्या दोन आयटी अभियंत्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. अपघातानंतर काही तासांतच आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला, ज्याच्या अटींमध्ये रस्ता सुरक्षेवर फक्त 300 शब्दांचा निबंध लिहिणे समाविष्ट होते. या निर्णयावर देशभर टीका झाली आणि मोठ्या प्रमाणात जनतेच्या संतापानंतर, आरोपीला तीन दिवसांनी पुण्यातील बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
या प्रकरणी मंगळवारी बाल न्याय मंडळाच्या निर्णयानुसार, अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाला कायद्याच्या विरोधात असलेल्या बालकासारखे वागवले जाईल आणि त्यानुसार खटला चालवला जाईल. पुणे पोलिसांनी त्यांच्या याचिकेत असा युक्तिवाद केला होता की हा एक जघन्य गुन्हा आहे आणि त्यात केवळ निष्काळजीपणाच नाही तर पुराव्यांशी छेडछाड करण्यासारखे गंभीर आरोप देखील आहेत. तथापि, मंडळाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि म्हटले की अल्पवयीन मुलाला अल्पवयीन म्हणून खटल्याला सामोरे जावे लागेल.