इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वदेशी चार्जर, पुण्यातील ARAI ने विकसित केले तंत्रज्ञान

बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (15:32 IST)
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी आणि वापरात वाढ झाली आहे. या वाहनांना आवश्यक चार्जिंगसाठी आता स्वदेशी चार्जर उपलब्ध होणार आहे.पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (ARAI) स्वदेशी प्रोटो टाइप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञान  विकसित केले आहे.हे तंत्रज्ञान भारत चार्जर्स स्टॅण्डर्ड,कॅडेमो,सीसीएस यांच्या तोडीचे आहे. त्यामुळे याद्वारे भारतीय कंपन्यांना आता या स्वदेशी चार्जरचे उत्पादन करता येणे शक्य होणार आहे.

एआरएआयचे संचालक डॉ.रेजी मथाई यांनी याबाबत माहिती देण्यासाठी पौड रोड, कोथरूड पत्रकार परिषद घेतली होती.‘इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जर सध्या आयात करण्यात येत आहेत मात्र केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या उपक्रमांमध्ये सहभागी होत एआरएआयने लाइट ईव्ही एसी चार्ज पॉइंट तंत्रज्ञान विकसित केले आहे,’अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘एआरएआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या वतीने भारत एसी 001 या पहिल्या चार्जरची निर्मिती केली जाणार आहे यासाठी आवश्यक टेस्टिंग हे एआरएआय प्रयोगशाळेत पूर्ण झाले असून त्याचा अनुपालन अहवाल देखील कंपनीच्या उच्चपदस्थ अधिका-यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील हा पहिलाच चार्जर असून या आधी एका खासगी संस्थेने हे तंत्रज्ञान एआरएआयकडून घेतले आहे,’असे उपसंचालक आनंद देशपांडे यांनी सांगितले.

‘पुण्याजवळील ताकवे येथे एआरएआयच्या वतीने नव्या मोबिलिटी रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार असून येत्या 4 ते 5 वर्षात विविध टप्प्यांत ते कार्यान्वित होईल. या सेंटरसाठी विविध टप्प्यात एकूण 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.’ असे एआरएआय संचालक डॉ. रेजी मथाई यांनी यावेळी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती