राज्यात पावसाने दमदार आगमन केले असून आज (सोमवार) गोव्यासह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात या महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. मात्र, मागील काही दिवसात विश्रांती घेतलेला पाऊस आता गोव्यासह महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पुणे शहरात काल दुपारनंतर पावसाचे दमदार आगमन झाले असून, आज (29 जून) मेघगर्जनेसह मध्य स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर 30 जून ते 4 जुलै पर्यंत मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडल्याचे वृत्त आहे.