कारमध्ये काच फोडण्यासाठी एखादे साधन सोबत ठेवा

बुधवार, 3 जून 2020 (10:50 IST)
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कार व इतर वाहनाने प्रवास करणार्‍यांसाठी बीएमसीकडून ‍विशेष सूचना करण्यात आली आहे. प्रवाश्यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असे साधन ठेवण्याची सूचना केली गेली आहे. दरम्यान पाण्यात वाहन अडकल्यास किंवा ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादे साधन असावे असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
 
तसं तर या दरम्यान शक्योतर घरातून बाहेर न पडण्याची सूचना केली गेली आहे तरी अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे लागेले तर चारचाकी वाहनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून गाडीमध्ये काच फोडता येईल असे साधन जसे हातोडा, स्टेपनी पान्हा चालकाला सहज हाती येते अशा ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता चालकाने जवळ ठेवावे असे बीएमसीने सांगितले आहे.
 
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 3 जून रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या मुंबईतील काही भागात पाऊस सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. 
 
उल्लेखनीय आहे की 2005 सालीच्या अतिवृष्टी दरम्यान काही चार चाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. म्हणून या प्रकाराची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती