डीएसके : 'घराला घरपण' देणाऱ्या डीसकेंच्या साम्राज्याला घरघर कशी लागली?

बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (14:30 IST)
गुंतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक करण्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांची जामिनावर सुटका झाली आहे.
डीएस कुलकर्णींवर नऊ हजार गुंतवणूकदारांची 800 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप आहे.
 
पाच वर्षांनंतर ते जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर आले आहेत. यापूर्वीही त्यांना जामीन मंजूर झालेला होता, परंतु त्यांची सुटका झालेली नव्हती.
 
2019 मध्ये गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती.
गोष्ट आहे 8 फेब्रुवारी 2018 रोजीची. दुपारच्या वेळी पुण्यातल्या मध्यवर्ती भागातल्या जेएम रोडवर असलेल्या डीएसके ग्रुपच्या ऑफिसमध्ये स्वतः डीएसकेंनी म्हणजे या ग्रुपचे संस्थापक दीपक सखाराम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
काही दिवसांच्या आधी डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांची पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दोन तास कसून चौकशी केली होती. गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर आधीच गुन्हा दाखल झाला होता. त्यासंदर्भात त्यांच्या कोर्टात वाऱ्या सुरूच होत्या. अशा परिस्थितीमध्ये डीएसके पत्रकार परिषदेत काय बोलणार याची पत्रकारांमध्येही उत्सुकता होती.
 
या पत्रकार परिषदेत डीएसकेंनी एक घोषणा केली. त्यावरुन त्यांच्यासमोरचे बाकीचे सगळेच मार्ग संपले आहेत हेच स्पष्ट झालं. डीएसकेंनी माध्यमांच्याद्वारे लोकांना जमेल तितकी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं.
 
'मला भीक नकोय पण उभारी देण्यासाठी मदत करा' असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं. थोडक्यात पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी crowdfunding चा मार्ग स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. मदत देण्यासाठी अकाऊंटचा नंबरही त्यांनी जाहीर केला.
 
कोट्यवधींचं साम्राज्य उभं करुन त्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या डीएसकेंना, तेच वाचवण्यासाठी लोकांकडून पैसे मागावे लागत होते. यानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांना दिल्लीतल्या एका हॉटेलमधून पुणे पोलिसांनी अटक केली. जवळपास 240 कोटी रुपयांचा फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर होता.
 
मराठी मध्यमवर्गाला स्वतःच्या घराचं स्वप्न दाखवून, त्यांच्या घराला घरपण देण्याचं आश्वासन देणाऱ्या डीएसकेंच्या साम्राज्याचं असं अधःपतन झालं.
 
दीपक सखाराम कुलकर्णी या मूळ नावाने त्यांना ओळखणारे कमीच लोक असतील. डीएसके या एका नावाने ते ब्रॅंड बनले. डीएसके आणि डीएसके ग्रुप हे नाव महाराष्ट्रभरात पोहोचलं.
 
80 च्या दशकात डीएसकेंनी बांधकाम क्षेत्रात उडी घेतली आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलं नाही. त्यांचं कार्यक्षेत्र हे फक्त बांधकाम क्षेत्रापुरत मर्यादित नव्हतं. इतर अनेक क्षेत्रांत जसे की, कार डीलरशीप, प्रशिक्षण संस्था, गुंतवणूक, इन्फोटेक यात त्यांनी गुंतवणूक करून तिथेही स्वतःचे व्यवसाय उभे केले. प्रेरणादायी वक्ता म्हणूनही त्यांचे व्हीडिओ आले.
 
ठेवीदारांचे पैसे बुडवण्याच्या केसमध्ये डीएसकेंना सुप्रीम कोर्टाने 27 जुलै रोजी जामीन दिला आहे. डीएसकेंवरील आरोप त्यांच्या वकिलांनी फेटाळले आहेत. त्यांच्यावरील आरोप हे बिनबुडाचे आहेत असे त्यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी सुप्रीम कोर्टासमोर म्हटले आहे.
 
पुण्यातल्या कसबा पेठेतून प्रवास सुरू
सुरुवातीच्या काळात पुण्यातील मध्यवर्ती अशा कसबा पेठेतून डीएसकेंच्या व्यवसायाची सुरुवात झाली. बांधकाम क्षेत्रात येण्याआधी त्यांनी फोन सुगंधित करणाऱ्या एका कंपनीची स्थापना केली होती.
 
घरातला फोन स्वच्छ करुन त्यावर सुगंधी पट्टी लावून सुगंध निर्माण करणारी अशी ही 'टेलिस्मेल' नावाची कंपनी होती. त्यानंतर ते बांधकाम क्षेत्रात उतरले.
 
"डीएसकेंच्या अंगात उद्योजकता भिनलेली होती. फोन सुगंधी करण्यापासून ते दुकानांच्या पाट्या स्वच्छ करण्यापर्यंत असे अनेक व्यवसाय त्यांनी केले. त्यांनी कुठलंही काम कमी लेखलं नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला. मध्यमवर्गीय माणसासाठी घर हा फार जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. ते त्यांचं स्वप्नच असतं, हे त्यांनी हेरलं आणि डीएसके या व्यवसायात पडले. त्यांचं एकप्रकारे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होतं.
 
"मराठी माणसांना जे जे काही आवडतं ते त्यांनी करायला सुरुवात केली. त्यांनी 'डीएसके गप्पा' नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. ज्यामध्ये कलाकारांशी संवाद आयोजित केला जायचा. थोडक्यात त्यांनी मराठी मध्यमवर्ग हा टार्गेट केला. त्यांच्या जाहिरातीही तशाच असायच्या," पुण्यातले वरिष्ठ पत्रकार आणि डीएसकेंचा प्रवास जवळून बघितलेले अद्वैत मेहता यांनी सांगितलं.
 
'घराला घरपण देणारी माणसं'
उद्यमशीलता डीएसकेंकडे होती. त्यांच्या भाषणांमधून ते मराठी लोकांना उद्यमशीलता वाढवण्यासाठी प्रेरित करायचे. उद्यमशीलतेसोबत त्यांच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आणि व्यवसायासंबंधातली दूरदृष्टी होती. यांचा त्यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा होता असं त्यांच्या एका जुन्या सहकाऱ्याने सांगतिलं.
 
 
"डीएसकेंना कुणी पहिल्यांदा जरी भेटलं तरीही त्या व्यक्तीच्या मनात आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचं कसब त्यांच्यात होतं. त्यांच्यात दुरदृष्टीही होती. टाऊनशिप संकल्पना त्यांनी पहिल्यांदा यशस्वी करून दाखवली. धायरी जवळचं डीएसके विश्व हे त्याचंच उदाहरण. नंतर त्यांनी रानवारा नावाची अशीच एक मोठी सोसायटी बांधली. त्यांच्या स्कीम्स नावंही मराठीच असायची.
 
"तसंच त्यांच्या जाहिरातींच्या टॅगलाईन काव्य किंवा साहित्याकडे झुकलेल्या असायच्या," असं डीएसकेंसोबत काम केलेल्या एका सहकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं.
 
'घराला घरपण..' ही टॅगलाईन कशी आली?
डीसकेंच्या स्कीम मध्ये घर असणं हे पुणेकरांसाठी कायमच प्रतिष्ठेची गोष्ट होती. डीसकेंची विश्वासार्हता वादातीत होती. डीसकेंच्या स्कीममध्ये घर घेणं हे मराठी पुणेकरांचं स्वप्न असायचं.
 
पुण्याच्या विविध भागात डीसकेंनी उभ्या केलेल्या स्कीम त्यांच्या लोगोसकट आजही दिमाखात दिसतात. अमुकतमुक व्यक्ती डीसके रानवारा, डीसके विश्व, या इमारतीत राहणाऱ्या लोकांची पुणेकरांत मान थोडी जास्त ताठ असायची.
 
डीसकेंकडे घर घेतलं की दर्जाची हमी असायची. घराचा ताबा घेताना घराची चाबी देण्याचा समारोह खास असायचा. एकूणच डीसके यांच्या नावाभोवती एक वलय होतं.
 
90 च्या दशकात औद्योगिकरणामुळे पुण्यात नवश्रीमंतांची संख्या वाढली त्या लोकांना घर आणि त्यांच्या घराला घरपण देण्याचं काम डीसकेंनी केलं.
 
पुण्यातल्या सेतू या जाहिरात एजन्सीचे संस्थापक शरद देशपांडे यांनी घराला घरपण देणारी माणसं ही टॅगलाईन दिली होती. ती डीसकेंची ओळख झाली. आता तेच डीसके घरपण काय घरही न देऊ शकल्याने त्यांच्या अजस्त्र साम्राज्याला घरघर लागली.
 
राजकीय महत्त्वाकांक्षा
पुण्यातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही डीएसकेंचा वावर होता. मध्यंतरी त्यांच्यामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षाही जागृत झाल्याचं दिसलं. त्यांनी 2009 साली पुणे मतदार संघातून खासदारकीची निवडणूक बहुजन समाजवादी पक्षाकडून लढवली होती.
 
"डीएसकेंनी राजकारणात उडी मारली. पण त्यांची निराशा झाली. त्यांना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी तिकीट दिलं नाही. त्यावेळेस मायावतींनी उत्तर प्रदेश मध्ये दलित आणि ब्राम्हण असा सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग केला होता. तेव्हा डीएसके बहुजन समाज पार्टीतर्फे उभे राहिले. पण त्यांना 60 हजारच मतं मिळाली.
 
"डीएसकेंनी निश्चितपणे या निवडणुकीत हवा निर्माण केली होती. त्यावेळेस डिजिटल मिडिया नवीन होता. पण त्याचा त्यांनी खुबीनं वापर केला होता. त्यांच्या आधीच्या मुलाखती ते प्रचारात दाखवायचे. यानंतरही त्यांनी बांधकाम क्षेत्रात खूप मोठी उडी मारली. पण वेगवेगळ्या कारणांमुळे ते गोत्यात यायला सुरुवात झाली," अद्वैत मेहता सांगतात. निवडणुकीत डीएसकेंना आर्थिक फटका बसला असंही सांगितलं जातं.
 
इतर व्यवसायांसोबतच डीएसकेंनी आर्थिक योजनांमधून गुंतवणुकीचा पर्याय दिला. यामध्ये त्यांनी आकर्षक वाटणारं 10 ते 12 टक्के व्याज देणार असल्याचं आमिष गुंतवणुकदारांसमोर ठेवलं. काही माध्यमांमधल्या रिपोर्टसनुसार ही एफडीची गुंतवणूक योजना 30 वर्षांपासून सुरू होती. सुरुवातीच्या काळात गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे वेळेवर मिळत होते.
 
पण 2016 मध्ये त्यात खंड पडला. हजारो मराठी गुंतवणूकदारांनी डीएसकेंच्या कंपनीत ठेवी ठेवल्या आणि त्यांचं नुकसान झालं.
 
डीएसकेंच्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे अडकलेले काही गुंतवणुकदार एकत्र आले आणि त्यांनी डीएसकेंविरोधात तक्रारी दाखल केल्या. तेव्हापासून डीएसकेंच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.
 
डीएसकेंनी घोटाळा कसा केला?
डीएसकेंनी घोटाळा कसा केला, त्यात त्यांच्यावर आरोप काय झाले, त्यावर डीएसकेंचा प्रतिवाद काय होता यावर बीबीसी मराठीने एक सविस्तर बातमी केली आहे.
 
डीएसकेंना कर्ज देणं, त्यांनी ती बुडवणं यात अधिकाऱ्यांचा हात होता असा हा आरोप आहे. डीएसकेंना विविध बँकांनी दिलेली कर्जं ही थोडीथोडकी नाहीत तर 3000 कोटींच्या आसपास आहेत.
 
त्यामुळे हा घोटाळ्याची व्याप्तीही खूप मोठी आहे.
 
डीएसके यांनी तेजीच्या काळात आपल्या कंपनीद्वारे मुदत ठेवीही सुरू केल्या होत्या. गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद देत त्यांच्याकडे जवळजवळ 1 हजार 115 कोटी रुपये गुंतवले.
 
हे पैसेही गुंतवणूकदारांना परत मिळालेले नाहीत. गृहनिर्माण प्रकल्प उभारणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. तर तिथेही गुंतवणूकदार अडकले आहेत. लोकांना घरांचा ताबा मिळालेला नाही.
 
सगळ्याच बाजूने गुंतवणूकदारांचे हाल झाल्यावर त्यांनी एकत्र येऊन चौकशी सुरू केली. तेव्हा एकेक प्रकरणं बाहेर आली.
 
बँकेत केलेला कर्ज घोटाळा हा आपल्याच नातेवाईकांच्या नावाने नवीन कंपन्या उघडून त्यांच्याकडच्या जमिनी डीएसके असोसिएट्स या मुख्य कंपनीला दामदुप्पट दराने विकण्याच्या षड्यंत्रातून घडला आहे.
 
कारण अवास्तव दराने जमिनी घेण्यासाठी बँकांकडून बेकायदेशीर कर्जं उचललं आहे आणि या कर्जांची परतफेड झालेली नाही.
 
बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला घोटाळा?
बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ देवीदास तुळजापूरकर यांच्याकडून बीबीसीने बँक घोटाळा समजून घेतला.
 
ते म्हणाले, घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही तेव्हा कर्जाचं खातं नॉन परफॉर्मिंग होतं. म्हणजे अधिकृतपणे बुडित कर्जाच्या यादीत जातं. त्यालाच नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतात.
 
"पण, तसं झालं तर अशा व्यक्तीला नवीन कर्ज देता येत नाही. म्हणून मग डीएसके यांचं खातं बुडित व्हायला आलं की लगेच बँक अधिकारी संगनमताने त्यांना छोट्या मुदतीचं नवीन कर्जं द्यायचे. त्यामुळे लगेचचा हप्ता भरला जाऊन खातं बुडित होण्यापासून वाचायचं." तुळजापूरकर यांनी सांगितलं.
 
"शिवाय नवीन कर्जं देतानाही नियम डावलले जात होते. कमी मुदतीचं कर्जं देणं हे बँकांकडून सर्रास केलं जातं. पण, डीएसके कर्जच फेडू शकले नाहीत तेव्हा सगळं प्रकरण बाहेर आलं," ते म्हणाले.
 
"कारण, काही कर्जं कागदपत्रं पूर्णपणे न तपासता दिली गेली होती. नवीन कर्ज घेऊन जुनी फेडायचं सत्र अवैधरित्या दहा वर्षं सुरू होतं," तुळजापूरकर यांनी प्रकरण आणखी स्पष्ट करून सांगितलं.
 
लोकांचा विश्वास जिंकून नंतर फसवणूक?
डीएसके म्हणजे दीपक सखाराम कुलकर्णी. शून्यातून वर आलेला उद्योजक अशी त्यांची प्रतिमा त्यांनी मागची २०-३० वर्षँ मराठी माणसाच्या मनात निर्माण केलेली आहे.
 
शिवाय एखाद्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमीपूजनाच्या दिवशी वास्तूशांतीचा म्हणजे ताबा देण्याचा दिवस जाहीर करणार आणि तो पाळला नाही तर स्वत:वर आर्थिक पेनल्टी लादणार असा नियम त्यांनी केला होता.
 
कंपनीच्या वेबसाईटवर तसं लिहिलंच आहे. त्यातून लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. आणि हळूहळू या विश्वासाच त्यांनी गैरफायदा घेतला, असं दिसत आहे.
 
बँक ऑफ महाराष्ट्र बँकेनं डीएसके यांना दिलेलं कर्ज सुमारे सव्वादोनशे कोटी रुपयांचं आहे.
 
ज्येष्ठ गुंतवणूक तज्ज्ञ वसंत कुलकर्णी यांचा डीएसके प्रकरणी सखोल अभ्यास आहे. त्यांनी कागदपत्रं आणि कंपनीची बॅलन्स शिटही तपासली आहे. त्यांच्याकडून बीबीसीने बँक घोटाळ्याची पद्धत समजून घेतली.
 
डीएसके यांनी आपली पत्नी हेमांती, मुलगा शिशिर, मेहुणी पुरंदरे आणि इतर अनेक मित्र यांच्या नावावर नवीन कंपन्या उघडल्या. या कंपन्यांच्या नावे ते जमिनी विकत घ्यायचे.
 
एखाद दुसऱ्या वर्षाने या जमिनीची किंमत वाढली असं दाखवून डीएसके असोसिएट्स या मुख्य कंपनीला त्या दुप्पट दराने विकायच्या. जमीन विकत घेताना पहिल्या कंपनीसाठी बँकेकडून कर्ज घ्यायचं.
 
"पुन्हा जमिनीची किंमत वाढली असं दाखवून दुसऱ्या आपल्याच कंपनीसाठी बँकेकडून वाढीव रकमेचं कर्ज घ्यायचं असा हा उद्योग," अशी माहिती त्यांनी दिली.
 
वसंत कुलकर्णी सांगतात की थोडक्यात, 'मोठ्या रकमेची कर्जं घ्यायची आणि अंशतः फेडायची, मग जमीन व्यवहारातल्या सगळ्या कंपन्या डीएसकेंच्याच मालकीच्या.'
 
डीएसकेंसाठी राज ठाकरे मैदानात
डीएसकेंना पाठिंबा देण्यासाठी 2017 साली स्वतः राज ठाकरे मैदानात उतरले होते. डीएसके हे फसवणारे नसून एका कठीण काळातून जात आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.
 
त्यांनी डीएसकेंच्या गुंतवणुकदारांची एक बैठकही घेतली होती. काही 'अमराठी' व्यावसायिक डीएसकेंना बदनाम करू पाहत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला होता.
 
डीएसकेंच्या वकिलांनी फेटाळले आरोप
डीएसकेंना आता ठेवीदारांचे पैसे बुडवण्याच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जामीन दिला आहे. पण त्यांच्यावर अद्याप चार इतर कोर्टात खटले सुरू आहेत त्यामुळे ते केव्हा बाहेर येतील याबाबत निश्चितता नाही.
 
डीएसकेंचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी सुप्रीम कोर्टासमोर आपले म्हणणे मांडताना डीएसकेंवरील आरोप फेटाळले आहेत. ते म्हणतात, "डीएसकेंवरील आरोप बिनबुडाचे आणि मोघम स्वरूपाचे आहेत. त्यांना यात अडकवण्यात आलं आहे. त्यांना फेब्रुवारी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून त्यांची अनेकवेळा चौकशी झाली आहे. तपास पूर्ण झाला आहे. चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रं मिळाली आहेत. असं असून देखील त्यांच्याविरोधात अद्याप सुनावणी देखील सुरू झालेली नाहीये ही महत्त्वाची बाब आहे."
 
सर्वांना घराची स्वप्नं दाखवण्याऱ्या डीएसकेंचा मुक्काम मात्र गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगातच आहे.
 








Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती