पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार

शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (08:24 IST)
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकऱ्यांना मोठी दिवाळी भेट देण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांना यापुढे 5 लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्क्यांनी  देण्याचा मोठा निर्णय  घेण्यात आला आहे. तीन लाखांवरील पुढील रकमेचे व्याज बँकेने स्वत:च्या नफ्यातून सोसावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत केली अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली.
 
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची  सर्वसाधारण सभा रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संस्थांचे प्रतिनिधी, व्यक्ती सभासद सहभागी झाले होते. सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी बँकेने संस्थांना 8 टक्के दराने लाभांश (Dividend) जाहीर केला.
मागील मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेकडे 11 हजार 329 कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने 8109 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. मागील आर्थिक वर्षात बँकेला 282 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. तर निव्वळ नफा (Net profit) 55 कोटी 10 लाख रुपये आहे. बँकेचा एनपीए (NPA) शून्य टक्के असल्याचे थोरात यांनी सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती