पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अनेकदा एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील गंभीर रुग्णांसाठी ८२ रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट ‘डायल १०८’ सेवेशी संपर्क साधताच रुग्णाला तत्काळ रुग्णवाहिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कार्डिअॅक किंवा अद्ययावत रुग्णवाहिकेकरीता ‘डायल १०८’द्वारे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद म्हणाले, ‘करोनाचा एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याच्या नातेवाइकांनी तत्काळ १०८ वर संपर्क साधावा. त्यानंतर अॅम्बुलन्स रुग्णालय अथवा संबंधित केंद्रावर पोहोचेल आणि रुग्णाला इच्छितस्थळी नेईल.’
‘डायल १०८’ रुग्णवाहिकेच्या सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, ‘२४ रुग्णवाहिका अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट म्हणजेच अद्ययावत सोयीसुविधांसह सज्ज असतील. ५८ रुग्णवाहिकांत मूलभूत सोयी देण्यात आल्या आहेत. ‘कोव्हिड केअर सेंटर’वरून रुग्णाला घेऊन रुग्णाच्या नातेवाइकांच्या सूचनेनुसार खासगी अथवा सरकारी रुग्णालयात पोहोचविण्यात येईल.’
एखाद्या रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी अथवा हस्तांतर करण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी चालकांच्या सुमारे १५३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिका करोनारुग्णांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यात पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ११३ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ४० रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णवाहिका ‘डायल १०८’ला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी १०८ सेवेशी संपर्क साधावा. असही सांगण्यात आले आहे.