पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध 8 हजार पानांचं आरोपपत्र

गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (12:14 IST)
पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह सात जणांवर 496 कोटी 44 लाख रुपये गैरव्यवहार प्रकरणात 8 हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल झालं आहे.
 
शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी तपास करून शिवाजीनगर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. यात आरोपींनी नियोजनबद्ध कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची 496 कोटी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहार प्रकरणात अनिल भोसलेंसह 7 जण अटकेत असल्याची माहिती सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली.
 
काय आहे प्रकरण?
अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक असून त्यांच्यासह त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.
 
बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खर्‍या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती