पुण्यातील फॅशन डिझायनर तरूणीला 7 लाखांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण

मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (08:17 IST)
कोरोनाच्या काळात सायबर गुन्ह्याचे प्रमाण तर अधिक वाढलं आहे. ऑनलाइनच्या माध्यमातुन अनेकांना गंडा  घातल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असाच एक प्रकार मंगलदास रस्ता परिसरातील उघडकीस आला आहे. आयडिया कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने फॅशन डिझायनर असलेल्या तरूणीला सीमकार्डची केवायसी अपडेटच्या नावाखाली तब्बल 7 लाख 32 हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
 
याबाबत माहिती अशी, फिर्यादी तरूणी मंगलदास रस्ता परिसरातील इमारती येथे वास्तव्यास आहे. त्यांचा फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय आहे. 30 जुलैला सायबर चोरट्याने त्यांना फोन करून आयडिया कंपनीमधून बोलत असल्याची बतावणी केली. आणि सीमकार्ड केवायसी अपडेट करण्याचे सांगितले. अन्यथा तुमचे सीमकार्ड बंद पडेल, अशी भीती त्याने दाखविली. तर, सायबर चोरट्याने  तरूणीला लिंक पाठवून क्रेडिट आणि डेबिट कार्डची गोपनीय माहिती भरण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार तरूणीला आलेला ओटीपी घेउन सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातील तब्बल 7 लाख 32 हजारांना गंडा  घातला आहे.
 
दरम्यान, या प्रकरणावरुन फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. तर, आरोपीचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या  पीआय दीपाली भुजबळ यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती