आरोग्य विभागाची उद्या ‘गट क’ संवर्गातील भरती परीक्षा

शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (21:35 IST)
आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गातील विविध पदांची भरती परीक्षा उद्या २४ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. चार लाखांहून अधिक परीक्षार्थी विविध पदांसाठी ही परीक्षा देणार आहेत. राज्य शासनाच्या कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे संपूर्ण पालन करून ही परीक्षा घेतली जाणार आहे.
 
राज्यभरातील विविध केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार असून पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुसरे सत्र दुपारी ३ ते ५ या वेळेत पार पडेल. चार लाखांहून अधिक परीक्षार्थी विविध पदांसाठी या दोन स्वतंत्र सत्रांमध्ये परीक्षेस सामोरे जातील. गट क संवर्गातील शस्त्रक्रिया गृह साहाय्यक, कनिष्ठ / वरिष्ठ तांत्रिक साहाय्यक, दंत आरोग्यक, दूरध्वनीचालक, लघुटंकलेखक, वाहनचालक इत्यादी, तर दुपारच्या सत्रातील परीक्षेद्वारे अभिलेखापाल, आहारतज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वॉर्डन आदी पदांसाठी भरती होणार आहे.
 
परीक्षेबाबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन वा गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षार्थींनी 020 26122256 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] या ईमेल पत्त्यावर माहिती पाठवावी. परीक्षा प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून परीक्षार्थींनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत ‘न्यासा कम्युनिकेशन’ने या परीक्षेद्वारे निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावरच होणार असल्याचे स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती