महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला कृषी पदवीधरच सोन्याचे दिवस आणतील -हर्षद माने

सोमवार, 13 जुलै 2015 (18:01 IST)
खानिवली येथे कृषी पदविकाधारकांसाठी मार्गदर्शन
 
खानिवली, भिवंडी येथील कृषी तंत्र निकेतन  महाविद्यालयात "ग्रंथसखा वाचनालय, चिराडपाडा" आणि प्रबोधक संस्था मुंबई यांच्या वतीने कृषी क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले होते.त्या प्रसंगी प्रबोधक चे संस्थापक हर्षद माने म्हणाले की कृषी क्षेत्र हे विविध संधींनी भरलेले आणि व्यापक आहे यात शासकीय सेवा आणी स्वयंरोजगार या विषयात कृषी पदवीधर खूप चांगले करिअर करू शकतो. 
 
कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी खास तीन विशेष प्रशासकीय सेवा परीक्षा आहेत याची जाणीवच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नसते. यामध्ये केंद्राची भारतीय वनसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र वनसेवा परीक्षा यांचा समावेश होतो.  उत्तीर्ण झाल्यावर शासनात उच्च पदांवर काम करण्याची आणि पदोन्नती द्वारे अधिकाधिक जबाबदार पदांवर जाण्याची संधी मिळते. मात्र दुर्दैवाने याची कल्पना अनेक कृषी पदवीधरांना नसते. राज्यसेवा आणि लोकसेवा परीक्षा निश्चितच प्रतिष्ठित आहेत आणि त्यासाठी पदवीधरांनी प्रयत्न करावा, मात्र केवळ कृषी पदवीधरांसाठी असलेल्या या परीक्षांसाठी विशेष प्रयत्न केले गेले पाहिजेत, कारण येथे स्पर्धा कमी असते,आणि प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी सुद्धा असते, असे हर्षद माने यांनी सांगितले. 
 
या व्यतिरिक्त कृषी पदविका आणि पदवीधरांसाठी कृषी विषयक उद्योजकता विश्वात मोठी भरारी मारण्याचे सामर्थ्य आहे. कृषी पदविका आणि पदवीधर "अग्रो क्लिनिक" सुरु करू शकतात, ज्याचा त्या गावातील  शेतकऱ्यांनाही लाभ होईल आणि  कृषी पदवीधरांना त्यातून स्वयंरोजगारही उपलब्ध होईल. त्याच प्रमाणे, बीज प्रक्रिया केंद्र, संकरीत बिजोत्पादन, कीड नियंत्रण केंद्र, सेंद्रिय शेती, फळबाग लागवड, औषधी वनस्पती अशा स्वरूपाच्या उद्योगांची मुहूर्तमेढ कृषी पदवीधरांना रोवता येईल. थोडक्यात मनात आणले तर कृषी पदवीधारकच महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला पुन्हा सोन्याचे दिवस आणू शकतील, असा विश्वास हर्षद माने यांनी व्यक्त केला.   
 
कृषी क्षेत्रात संशोधनाची नितांत आवश्यकता असल्याने, त्यासाठी कृषी विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत असे आवाहन हर्षद माने यांनी केले.    
 
कल्याण येथील मोटिव्हेशनल ट्रेनर श्री नरेद्र पाटील यांनी विद्यार्थांना  स्पर्धा परिक्षांचे महत्व पटवून दिले.
 
तंत्रनिकेतन चे प्राचार्य श्री मिलींद घरत यांनी प्रास्ताविकात, आम्ही या कार्यक्रमाला लगेच परवानगी दिली असे सांगून असे कार्यक्रम सर्वच कृषी महाविद्यालयात होण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले .
 
महाविद्यालयाचे खरे सर, प्रबोधक आणि ग्रंथसखाचे श्री दत्तात्रय कारवे, श्री. कैलास ढमणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.श्री. राहूल ढमणे यानी खणखणीत अशा आवाजात कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची धुरा साभाळली. 

वेबदुनिया वर वाचा