'जो गोल्ड जीता वो भी म्हारा लडका', नीरज चोप्राच्या आईची पाकिस्तानी खेळाडूबद्दलची प्रतिक्रिया चर्चेत

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (15:35 IST)
“आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्यासाठी रौप्य पदक हे सुवर्ण पदकासमानच आहे. जो गोल्ड जीता वो भी म्हारा लडका है जी...त्यानेही खूप मेहनत घेतली आहे.”
नीरज चोप्राच्या कामगिरीवर त्याच्या आई सरोज सरोज देवी यांनी आनंद व्यक्त करत भावना व्यक्त केल्या.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक क्रीडाप्रकारात भारताच्या गोल्डन बॉय नीरज चोप्राने रौप्यपदक तर, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक पटकावलं आहे.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं 92.97 मीटरवर भालाफेक करत नवा ऑलिंपिक विक्रम प्रस्थापित केला आणि सुवर्णपदक आपल्या नावे केलं. तर, नीरज चोप्रानं 89.45 मीटरवर भालाफेक करत रौप्यपदक पटकावलं.
 
पदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना नीरज चोप्रा म्हणाला, “एखादा दिवस एखाद्या खेळाडूसाठीच असतो. आजचा दिवस अर्शदसाठीच होता. त्या त्या दिवशी खेळाडूची शरीरयष्टीही वेगळीच असते. प्रत्येक गोष्ट परफेक्ट असते जशी आज अर्शदसाठी होती. टोकियो, बुडापेस्ट आणि आशियाई गेम्सच्यावेळी माझा दिवस होता.”
 
नीरज चोप्राच्या आई सरोज देवी यांनी आपल्या मुलाबरोबरच पाकिस्तानच्या अर्शद नदीमबाबतही आनंद व्यक्त केला.
अर्शद आणि नीरजच्या पॅरिस ऑलिंपिकमधील या उपलब्धीची पाकिस्तानातही मोठी चर्चा होत आहे. मीडियासह सोशल मीडिया, आम-खास प्रत्येकजण त्यांच्या या वियजावर आनंदित असून विविध प्रतिक्रिया देत आहेत.
 
पाकिस्तानचा मीडिया काय म्हणतोय?
पाकिस्तानमधील जीओ टीव्हीच्या वेबसाईटवरील टॉप तीन बातम्या अर्शद नदीमच्या नावावर आहेत.
 
पहिल्या बातमीतील हेडिंग आहे – “पाकिस्तानमधील भालाफेक खेळाडू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये सुवर्णपदक पटकावलं, 40 वर्षांची पोकळी भरुन निघाली”
 
या बातमीत नीरज चोप्राबाबत लिहिलयं की भारतासाठी लागोपाठ दुसऱ्यांदा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्याची उमेद असलेल्या नीरज चोप्राने 89.45 मीटरवर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकलं.
दुसऱ्या बातमीतील हेडिंग आहे – “देशाचा गौरव : पाकिस्तानने अर्शद नदीमचं भरभरुन कौतुक केलं”
 
जिओ टीव्हीवरील या बातमीत अर्शदच्या आईची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. – “माझ्या मुलाच्या सफलतेसाठी मी खूप प्रार्थना केली होती. संपूर्ण देशानेही माझ्या मुलाच्या सफलतेसाठी प्रार्थना केली होती.”
 
पाकिस्तानी बेवसाईट डॉनच्या होमपेजला अशाप्रकारे डिझाइन करण्यात आलंय की ते पोर्टल ओपन करताच त्यावर रंगबिरंगी रिबीन दिसतात. हे रिबीन एखाद्या समारोह किंवा उत्सवादरम्यान वापरतो त्याचप्रकारचे आहेत.
पाकिस्तानची प्रतीक्षा संपली
डॉनच्या बातमीतील हेडिंग आहे – “भालाफेक स्टार अर्शद नदीमच्या माध्यमातून ऑलिंपिक मेडलसाठी पाकिस्तानची 40 वर्षांची प्रतीक्षा संपली.”
 
या बातमीत नीरज आणी अर्शदबाबत लिहिण्यात आलंय की, “आज रात्री अंतिम फेरीत पाकिस्तान-भारतमध्ये प्रतिद्वंदता दिसली, जिला नदीम आणि चोप्राने वर्षांपासून जीवित ठेवलंय. गेल्या वर्षी ही जोडी 1-2 वर होती, जेव्हा वर्ल्ड ॲथलेटिक्स चँपियनशिपमध्ये चोप्रा आणि नदीमने रौप्यपदक जिंकले होते.”
 
डॉनच्या पानावर दिसत असलेल्या जवळपास सर्वच प्रमुख बातम्या अर्शद नदीमवर आहेत. डॉन ने एक व्हीडिओदेखील शेअर केलाय ज्यात पाकिस्तानी जनता ढोलच्या तालावर आनंद साजरा करताना दिसत आहेत.
पाकिस्तानी बेवसाईट द एक्सप्रेस ट्रिब्यूनवरही या विजयाची चर्चा आहे. यातील बातमीच शीर्षक आहे – “अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकलं, पाकिस्तानमधील 32 वर्षांचा दुष्काळ संपला.”याआधी सन 1992 मध्ये पाकिस्तानी हॉकी टीमला कांस्यपदक मिळालं होतं.
 
पाकिस्तानी नेते काय म्हणाले?
पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले, “शाबास अर्शद. इतिहास घडवलास. पाकिस्तानातील पहिला पुरुष भालाफेक चँपियन अर्शद नदीम पॅरिस ऑलिंपिक 2024 चं सुवर्णपदक पटकावून घरी आणतोय! तुम्ही संपूर्ण देशाला गौरवान्वित केलयं.”
 
पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांनी लिहिलयं, “पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अर्शद नदीमला शुभेच्छा. एका पाकिस्तानीने व्यक्तीगत रुपाने ॲथलेटिक्ससाठी ऑलंपिकमध्ये सुवर्ण जिंकण्यासाठीची ही पहिलीच वेळ आहे.”
 
बिलावल भुट्टो जरदारी यांनी एक्सवर (पुर्वीचं ट्विटर) प्रतिक्रिया दिलीय – “92.97 मीटरमधील भालाफेक प्रकारात ऑलिंपिक रेकॉर्ड मोडण्यासाठी अर्शद नदीमला शुभेच्छा. पाकिस्तानसाठी सुवर्णपदक.. आम्हा सर्वांना या क्षणाचा अभिमान वाटतोय.”
पीएमएल-एन पक्षाच्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर एक पोस्ट रिट्विट करत लिहिलंय – “दोन्ही वेळेस पीएमएल-एनचे सरकार होते.”
रिट्विट पोस्टमध्ये पूर्व पंतप्रधान इम्रान खान आणि अर्शद नदीम यांचा फोटो आहे.
इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकलं होतं.
 
सामान्य लोक काय म्हणतायत?
फखर जमान नामक अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलंय, “ऑलिंपिकमध्य सुवर्णपदक जिंकण्साठी अर्शद नदीमला शुभेच्छा. तुमच्या या कामगिरीवर पाकिस्तानला गर्व आहे.”
पाकिस्तानी पत्रकार एहतिशाम उल हक यांनी नीरज चोप्राच्या आईचा व्हीडिओ शेअर केला असून नीरजच्या आईने अर्शदच्या कामगिरीवर व्यक्त केलेल्या भावना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिल्या आहेत.
एहतिशाम यांनी लिहिलंय – “या सुंदर संदेशासाठी धन्यवाद आई.”
 
पाकिस्तान क्रिकेटच्या अधिकारिक हँडलवर लिहिलयं – “पॅरिसमध्ये इतिहास घडलाय. अर्शद नदीमने 92.97 मीटरवरील भालाफेक प्रकारात पदक जिंकत 1984 नंतर पाकिस्तानला पहिलं सुवर्ण मिळवून दिलंय.”
मलाला युसुफजई एक्सवर लिहितात, “शुभेच्छा अर्शद नदीम. तुम्ही इतिहास रचलाय. पाकिस्तानातील युवा पीढीला त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ते साकार करण्यास प्रेरित करणारे चँपियन म्हणून तुम्ही ओळखले जाल.”
 
फ्रांसमधील पाकिस्तानी दुतावासच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आलयं – “गौरवपूर्ण क्षण होता. अर्शद आम्ही गौरवान्वित झालोय. शुभेच्छा तुला.”
कराचीतील पत्रकार फैजान लखानी एक्सवर पोस्ट करतात, “असा दिवस आपल्या आयुष्यात येईल, अशी मी कल्पनादेखील केली नव्हती. पाकिस्तानने ऑलिंपिकमध्ये सुवर्ण जिंकणं ते ही विक्रम रचत, हे एखाद्या स्वप्नासारखं आहे. अर्शद नदीमला शुभेच्छा. प्रयत्न केलं तर सर्वकाही संभव आहे हा विश्वास तु नव्या पीढीत रुजवला. या ऐतिहासिक विजयासाठी आणि इतिहास रचण्यासाठी धन्यवाद अर्शद नदीम.”

अर्शद नदीमबाबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी
अर्शद नदीम 2016 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करतोय, मात्र 2019 पर्यंत तो प्रसिद्धीच्या झोतात नव्हता.
 
2016 मध्ये, भारतातील गुवाहाटीमध्ये आयोजित दक्षिण आशियाई खेळांत त्याने कांस्यपदक जिंकलं होतं. पुढच्या वर्षी बाकू येथे आयोजित इस्लामिक खेळांमध्ये तो तिसऱ्या स्थानावर होता.
 
2018 साली आशियाई खेळांत त्याने कांस्यपदक जिंकलं होतं, मात्र त्यावर्षी गोल्ड कोस्टमध्ये आयोजित राष्ट्रमंडळ खेळांत तो आठव्या स्थानी राहिला होता.
 
अर्शद नदीमच्या करिअरला कलाटणी मिळाली ती 2019 मध्ये नेपाळ येथे आयोजित दक्षिण आशियाई खेळांमध्ये, जेथे त्याने 86.29 मीटरवर भालाफेक करत नवीन विक्रम रचला, आणि टोकियो ऑलिंपिकमध्ये क्वालिफाय होण्यात सफल झाला होता.
पाकिस्तानच्या ॲथलेटिक्स इतिहासातील ही पहिलीच वेळी होती जेव्हा एखाद्या एथलिट ने ऑलिंपिकमध्ये सरळ स्थान प्राप्त केले. याआधीच्या वर्षांत पाकिस्तानचे एथलीट्स वाइल्ड कार्ड एंट्रीच्या माध्यमातूनच ऑलिंपिकम
 
ध्ये सहभागी होत होते.
 
ऑलिंपिकआधी, अर्शद नदीमने ईरानमध्ये ॲथलेटिक्स स्पर्धेत 86.38 मीटरवरील स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम केला होता.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये तो 84.62 मीटरच्या पुढे जाऊ शकला नाही आणि त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र आगामी सामन्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत त्याने दिले होते.
 
अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून आपल्या स्वप्नाला सत्यात उतरवले आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती