पॅरिस ऑलिंपिक : हॉकीत भारताला कांस्यपदक, श्रीजेशचा हॉकीला अलविदा

गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (21:04 IST)
भारताच्या पुरुष हॉकी टीमनं पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.
 
कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारतानं स्पेनवर 2-1 असा विजय साजरा केला आणि सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये तिसरं स्थान मिळवलं.
 
हॉकीमध्ये भारताचं हे आजवरचं एकूण तेरावं पदक ठरलं आहे. ऑलिंपिकच्या इतिहासात भारतानं आता हॉकीत 8 सुवर्ण, एक रौप्य आणि 4 कांस्यपदकं मिळवली आहेत.
 
52 वर्षांत पहिल्यांदाच भारतानं सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदकं मिळवली आहेत. याआधी टोकियो ऑलिंपिकमध्येही भारतानं कांस्यपदकाची कमाई केली होती.
 
आजचा सामना हा भारताचा स्टार गोलकीपर आणि माजी कर्णधार श्रीजेशचा अखेरचा सामना होता.
 
भारताच्या अमन सहरावतनं पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
 
अमन या ऑलिंपिकमध्ये खेळणारा एकमेव पुरुष पैलवान आहे. त्यानं 57 वदजनी गटात अल्बानियाच्या जालिखान अबा करोव्हला हरवून उपांत्य फेरी गाठली. त्याआधी त्यानं व्लादिमीर इगोरेफला हरवलं होतं.
 
आता उपांत्य फेरीत अमनला जपानच्या रेई हिगुचीचा सामना करायचा आहे. भारतीय वेळेनुसार ही कुस्ती रात्री 9:45 नंतर सुरू होईल.
 
अंतिम पंघालवर शिस्तभंगाची कारवाई
पैलवान अंतिम पंघाल आणि तिच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफला पॅरिस ऑलिंपिकमधून भारतात परत पाठवलं जाणार आहे.
 
अंतिम पंघालने तिचं ऑलिंपिक व्हिलेज अ‍ॅक्रेडिटेशन (एक प्रकारचा पास) बहिणीला दिलं होतं. नियमांनुसार आपलं अ‍ॅक्रेडिटेशन दुसऱ्याला देता येत नाही.
 
त्यामुळे पंघाल आणि तिच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय ऑलिंपिक असोसिएशननं दिली आहे.
 
अंतिम पंघाल 7 ऑगस्टला कुस्तीच्या 53 किलो वजनी गटात सहभागी झाली होती, पण पहिल्याच फेरीत बाहेर पडली होती.
 
मीराबाईचं पदक थोडक्यात हुकलं (7 ऑगस्ट)
भारताच्या मीराबाई चानूला ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 
वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईनं टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. पण पॅरिसमध्ये अवघ्या एका गुणानं तिचं पदक हुकलं.
 
मीराबाईनं स्नॅच प्रकारात 85 किलो वजन उचलत चांगली सुरुवात केली. तिचा दुसरा प्रयत्न अपयशी ठरला. पण तिसऱ्या प्रयत्नात तिनं 88 किलो वजन उचललं.
 
मग क्लीन अँड जर्क प्रकारात दुसऱ्या प्रयत्नात तिनं 111 किलो वजन उचललं. अखेरच्या सहाव्या प्रयत्नात मीराबाईनं 114 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तिला यश आलं नाही. 200 गुणांसह तिला चौथं स्थान स्वीकारावं लागलं.
 
2022 आणि 2023 साली मीराबाई चानूला बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
 
पुरुषांच्या 3000 मीटर शर्यतीत अविनाश साबळेनं चांगली सुरुवात करत आघाडी घेतली होती. पण त्याला अकराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 
अविनाशनं 8 मिनिटे आणि 14.18 सेकंदांत शर्यत पूर्ण केली. मोरोक्कोचा सुवर्णविजेता सुफियान अलबकालीपेक्षा तो जेमतेम 9 सेकंद मागे राहिला.
 
अविनाशला पदक मिळालं नसलं तरी त्याचं यश ऐतिहासिक आहे. कारण या प्रकारात फायनल गाठणारा तो पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे.
 
विनेश पदकाचं स्वप्न भंगलं, क्रीडा न्यायालयात धाव (7 ऑगस्ट)
भारताची विनेश फोगाट वजनाच्या निकषावर पॅरिस ऑलिंपिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली होती.
 
विनेशनं त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. विनेश आणि भारतीय पथकानं कोर्ट ऑफ आर्बिटरेशन फॉर स्पोर्टस (CAS) या खेळांसाठीच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केलं आहे.
 
विनेश फोगाटकडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचली. पण वजनाच्या नियमात न बसल्याने विनेश अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली, आणि सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न भंगलं.
 
महिलांच्या फ्री-स्टाईल कुस्तीमध्ये विनेश 50 किलो वजनी गटात खेळत होती. पण सकाळी फायनल पूर्वी वजन घेतलं गेल्यानंतर अधिकाऱ्यांना तिचं वजन प्रमाणित मर्यादेपेक्षा जास्त आढळलं.
 
भारतीय पथकाने हे काही ग्रॅम वजन घटवण्यासाठी थोडा अवधी मागितला, पण अखेर वजन घटवता न आल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं.
 
विनेशला 2022 सालच्या बीबीसी इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती