ज्या मैदानातून दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं, त्याच मैदानात जोकोविचनं पटकावलं सुवर्णपदक
सोमवार, 5 ऑगस्ट 2024 (14:25 IST)
नोवाक जोकोविचला दोन महिन्यांपूर्वी दुखावलेला गुडघा सांभाळत ज्या रोलँड गॅरोस टेनिस कोर्टावरून बाहेर जावं लागलं होतं, त्याच मैदानात नोवाक जोकोविच सुवर्णपदक पटकावल्यानंतर गुडघ्यावर बसून ढसाढसा रडत होता.
टेनिसच्या खेळातील चार प्रमुख मोठ्या स्पर्धा आणि ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावून नोवाक जोकोविचने 'गोल्डन स्लॅम' पूर्ण केलं आहे.
नोवाकने वयाच्या 37 व्या वर्षी जोरदार पुनरागमन करत स्पेनच्या 21 वर्षीय कार्लोस अल्काराझचा 7-6 (7-3), 7-6 (7-2) असा पराभव करून त्याच्या पाचव्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
तब्बल अडीच तासांहून अधिक वेळ चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळ केला. पण शेवटी जोकोविचने अनुभव आणि चिकाटीच्या जोरावर टाय ब्रेकरमध्ये कार्लोस अल्काराझचा पराभव केला.
राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, आंद्रे आगासी आणि स्टेफी ग्राफनंतर एकेरी टेनिसमध्ये 'गोल्डन स्लॅम'करणारा जोकोविच हा केवळ पाचवा खेळाडू ठरला.
टेनिसमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन या चार स्पर्धांसोबतच ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूला गोल्डन स्लॅम पूर्ण करता येतो.
अनेक महान खेळाडूंना हा बहुमान मिळवता आलेला नसला तरी सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अखेर हे स्वप्न पूर्ण केलं आहे.
असा रंगला अंतिम सामना
मागच्या सोळा वर्षांपासून हुलकावणी देणाऱ्या सुवर्णपदकाला यंदा घरी घेऊन जायचंच असं ठरवून आलेल्या नोवाकने पॅरिसच्या रोलँड गॅरोस टेनिस कोर्टवर सुरुवातीपासून दमदार खेळ केला.
पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर निव्वळ दृढनिश्चयाच्या बळावर जोकोविचने पुनरागमन केलं.
हा सामना अडीच तासांपेक्षा जास्त वेळ सुरु होता. रोलँड गॅरोसवर लाल मातीच्या मैदानात कधी 21 वर्षांचा कार्लोस त्याची चपळाई आणि ताकद दाखवून द्यायचा तर मागची दोन दशकं टेनिसवर राज्य केलेला जोकोविच अनुभवाच्या जोरावर अतिशय शिताफीने पॉईंट मिळवायचा.
एकमेकांच्या अप्रतिम फटक्यांना कधी हसून दाद देत, तर कधी स्वतःच्याच खराब फटक्यावर निराश होत हे दोन खेळाडू अंतिम सामना खेळत होते. पॅरिसमध्ये ऑलिंपिकचा अंतिम सामना बघायला आलेले प्रेक्षकही विभागले गेले होते. स्पेनचा झेंडा घेऊन कार्लोसला पाठिंबा देणारे हजारो स्पॅनिश फॅन्स एकीकडे तर टेनिसमध्ये सर्बियाला सर्वोत्तम विजेतेपदं मिळवून देणाऱ्या 'नोले'(जोकोविचचं टोपणनाव)चे दर्दी चाहते दुसरीकडे.
कार्लोस अल्काराझने ताकद आणि नजाकतीच्या बळावर जोकोविचच्या क्षमतांना आव्हान दिलं होतं पण, अनुभवी जोकोविचने शेवटपर्यंत हार मानली नाही. आठ ब्रेक पॉईंट वाचवत त्याने पहिला सेट टाय-ब्रेकरमध्ये नेला आणि तिथे सफाईदार फटक्यांच्या बळावर कार्लोस अल्काराझचा पराभव केला.
दुसऱ्या सेटही टाय-ब्रेकरमध्ये गेला आणि तिथे जोकोविचने कार्लोसला परत येऊच दिलं नाही. शेवटी फोरहँडचा एक जोरदार फटका मारत जोकोविचने हा सामना जिंकला.
2008 पासूनची प्रतीक्षा अखेर संपली
जिंकल्यानंतर नोवाकने जमिनीवर रॅकेट फेकण्यापूर्वी प्रेक्षकांना दोन्ही हात उंचावून अभिवादन केलं.
नोवाकने गोल्डन स्लॅम पूर्ण केलाय, ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवलंय यावर विश्वास बसायला कदाचित त्यालाही काही सेकंद लागले असतील. त्याने नेटजवळ येऊन कार्लोसला घट्ट मिठी मारली, पंचांशी हात मिळवला आणि मग टेनिस कोर्टच्या मध्यभागी येऊन जोकोविचने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
जोकोविचच्या चाहत्यांनी त्याला यापूर्वी भावनिक होताना, रॅकेट तोडताना, शर्ट फाडताना बघितलं असेल पण सुवर्णपदकानंतर एखाद्या लहान मुलाप्रमाणे जोकोविच ढसाढसा रडत होता.
टेनिस जगतात उदयास येऊ पाहणारा कार्लोस अल्काराझ पराभवाच्या दुःखामुळे रडत असला तरी त्याच्यासाठी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. 2008 पासून प्रयत्न करणाऱ्या नोव्हाक जोकोविचला या विजयासाठी तब्बल सोळा वर्षं वाट बघावी लागली होती.
नोवाक जोकोविचने 2008 मध्ये बीजिंग ऑलिंपिकमध्ये एकेरी कांस्यपदक जिंकलं, लंडन 2012 ऑलिंपिकमध्ये तो चौथ्या स्थानी राहिला, 2016ला झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये त्याला एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि तीन वर्षांपूर्वी टोकियोत झालेल्या ऑलिंपिकमध्ये कांस्य-पदकाच्या सामन्यात त्याचा पराभव झाला.
नोवाक जोकोविचने एकेरी टेनिसमध्ये खेळली जाणारी जवळपास प्रत्येक स्पर्धा जिंकली आहे.त्याच्याकडे 24 ग्रँड स्लॅम्स, 1 डेव्हिस कप आणि कित्येक एटीपी विजेतेपदं आहेत आणि आता तब्बल दीड दशकं त्याला हुलकावणी देणारं ऑलिंपिक सुवर्णपदकही त्याने जिंकलं आहे.
'माझ्यासाठी हा सगळ्यात मोठा विजय'
ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर बोलताना नोवाक जोकोविच म्हणाला की, "नक्कीच हा माझ्या आजवरच्या कारकिर्दीतला सगळ्यात मोठा विजय आहे. व्यावसायिक खेळांचा विचार केला तर त्या मैदानावर सर्बियाचा झेंडा उंचावत असताना, सर्बियाचं राष्ट्रगीत गात, माझ्या गळ्यात असलेल्या सुवर्णपदकापेक्षा मोठं काहीही असू शकत नाही."
नोवाक म्हणाला की, "जिंकल्यानंतरच्या क्षणात मी जे काही अनुभवलं ते सर्वोत्तम होतं. मी ज्या ज्या गोष्टींचा विचार केला होता, अपेक्षा केली होती त्याहीपलीकडचा तो आनंद होता."
नोवाक ही प्रतिक्रिया देत असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेलं त्याचं कुटुंब अतिशय अभिमानाने त्याला दाद देत होतं. त्याची 6 वर्षांची मुलगी तारा हातात 'डॅड इज बेस्ट'चा फलक घेऊन उभी होती.
भविष्याबाबत बोलताना जोकोविच म्हणाला की, "पुढे काय होईल मला माहिती नाही. मला आत्ता या विजेतेपदाचा आनंद लुटायचा आहे. हा प्रवास खूप खूप मोठा होता, अनेक वर्षं मी या सुवर्णपदकाचं स्वप्न बघितलं आहे. त्यामुळे आता मी फक्त आनंद साजरा करणार आहे, जल्लोष करणार आहे."
जोकोविचसाठी मागचे काही महिने आणि संपूर्ण सिझनच चांगला गेला नाही.
तो ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत इटलीच्या जॅनिक सिनरकडून पराभूत झाला,रोलँड गॅरोसमध्ये दुखापतग्रस्त झाला, विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझने त्याचा एकतर्फी पराभव केला पण अखेर तो आता जिंकला आहे.
पॅरिस ऑलिंपिकच्या एकेरी टेनिस स्पर्धेत इटलीच्या लॉरेन्झो मुसेट्टीने कांस्यपदक पटकावलं, तर कार्लोस अल्काराझने पहिल्याच ऑलिंपिकमध्ये रौप्यपदकापर्यंत मजल मारली आहे,
नोवाकने आत्तापर्यंत निवृत्तीचे संकेत दिलेले नाहीत आणि 2028 च्या लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये तो सहभागी होणार नाही असंही त्याने कधीच सांगितलेलं नाही. त्यामुळे कदाचित वयाच्या 41 वर्षी नोव्हाक पुन्हा एकदा सुवर्णपदक राखायला उतरू शकतो.