खलनायक निळू फुले

WDWD
एरवी 'मास्तर' या शब्दांत काय आहे? कुणीही म्हणावं असा शब्द. पण तोच शब्द जेव्हा निळू फुलेंच्या तोंडातून येतो, तेव्हा त्यातली खोली नि त्या शब्दाला असलेल्या भयाचं वलयही स्पष्ट जाणवतं. निळूभाऊंच्या घोगर्‍या, बसक्या आवाजातून फुटणारा हा शब्द समोरच्या व्यक्तिरेखेचाच नाही, तर पाहणार्‍या तटस्थ प्रेक्षकाच्या मनालाही भयाच्या कवेत घेऊन यायचा. त्यांची बेरकी नजर प्रेक्षकांच्याही आरपार जायची. हीच नजर, सूचक हावभाव नि संवाद हे निळूभाऊंचं बलस्थान खरंच. पण तरीही त्यांच्यात असं काय होतं, ज्यामुळे त्यांच्या खलनायकी भूमिका इतक्या नावाजल्या गेल्या. प्रभावी ठरल्या?

'खलनायक' हा शब्द निळूभाऊंसाठी मोठीच मर्यादा घालून बसला. वास्तविक सिंहासनमध्ये पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारणार्‍या निळूभाऊंनी विविधांगी व्यक्तिरेखा बर्‍याच केल्या, पण त्यांच्यावर प्रभाव या खलनायकी व्यक्तीरेखांचाच जास्त पडला. त्याचा परिणाम त्यांच्यातल्या अष्टपैलू अभिनेत्याभोवती मर्यादांचे रिंगण आखण्यात झाला. तरीही त्यांच्या खलनायकी भूमिकांचा प्रभाव इतका का पडला हा प्रश्न उरतोच.

वास्तविक त्यांच्याही आधी मराठी चित्रसृष्टीत खलनायक होते. पण तरीही प्रेक्षकांच्या मनात रुतून बसेल नि खोलवर भीतीचं सावट नेईल अशा खलनायकाची नक्कीच कमतरता होती. एक गाव बारा भानगडीतून अनंत मानेंनी हा नवा खलनायक प्रेक्षकांसमोर आणला. त्यामुळे तोपर्यंत मराठी सिनेमातली खलनायकाची मोठी पोकळी निळूभाऊंनी भरून काढली, खरं तर ते या पोकळीत पूर्णपणे व्याप्त झाले. त्यामुळे दुसरा कुठलाही खलनायक त्यांच्यासमोर उभा राहू शकला नाही. कुलदीप पवारने थोडेफार प्रयत्न केले पण कुवतीचा फरक फार मोठा पडला. मग थेट ८० च्या दशकात दीपक शिर्के, राहूल सोलापूरकर आणि इतर असे नवे खलनायक उदयाला आले. पण निळूभाऊंचा प्रभाव त्यांना पकडता आला नाही. एकतर या काळात मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांनाही पाठ फिरवली होती. त्यामुळे मराठी चित्रसृष्टीतला खलनायक म्हणून नाव येते ते निळूभाऊंचेच.

सरपंच, पाटील या सत्ताधारी व्यक्तींभोवती असलेल्या नकारात्मक छटा निळूभाऊंनी अधिक उलगडून खुल्या करून दाखविल्या. निळूभाऊंनी सादर केलेल्या या व्यक्तिरेखा भलेही काल्पनिक असल्या तरी त्या काळातल्या सत्ताधार्‍यांचेच प्रतिनिधित्व करणार्‍या होत्या यात काही शंका नाही. सहकारी चळवळीच्या माध्यमातून सर्व सत्ताकेंद्रे आपल्या हातात ठेवणार्‍या मूठभरांचे खरे चित्र निळूभाऊंनी समोर आणले. खरे तर सामान्यांच्या मनी या गोष्टी होत्याच, पण निळूभाऊंनी त्या पडद्यावर आणून या मंडळीचा दंभस्फोट केला. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिरेखांना बाया-बापड्यांनी शिव्या घातल्या. आपल्या आजूबाजूला बघणार्‍या राजकारणी व्यक्तींमधीलच एक समोर पडद्यावर दिसते आहे आणि ती इतरांचे फक्त वाईटच करू शकते, एवढे या बाया-बापड्यांच्या मनात पक्के बसलेले असायचे. त्यातूनच त्यांचा राग अनावर यायचा नि तोंडातून शिव्या बाहेर पडायच्या.

इतकी स्पष्ट दाद फारच क्वचित मिळते. निळूभाऊ व्यक्तिरेखेच्या माध्यमातून थेट सत्यापर्यंत म्हणजे तत्कालीन सत्ताधीशांच्या मूळ व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचत होते. सत्ताधीशांचे अविभाज्य गुणही त्यांनी तितक्याच नागवेपणाने लोकांसमोर आणले. त्यांचा स्त्रीलंपटपणाही त्यांच्या संवादातून टपकत असायचा, म्हणूनच तर 'बाकी....पोरीला साडीचोळी..ह्ये$$$ आमी करु! आवो खानदानी पध्दतय ती आमची!' या संवादातून काय अभिप्रेत आहे, हे कळायला वेळ लागायचा नाही आणि संताप अनावर व्हायचा. 'बाई, अहो आपला स्वतःचा येव्हडा वाडा असताना तुम्ही त्या पडक्यात राहणार ? तुम्हाला तिथे बघुन, आम्हाला हिकडं रातीला झोप यायची नाही, हे म्हणणारी व्यक्ती किती पोहोचलेली असेल आणि त्याचे हेतू काय आहेत, हे कळून प्रेक्षकाच्या मनात चीड आणि त्या स्त्री व्यक्तिरेखेविषयी सहानुभूती चटकन निर्माण व्हायची. ही 'चीड' म्हणजे निळूभाऊंना दाद असली तरी राजकारणी मंडळीच्या स्त्रीलंपटपणाविरोधतला निषेधही होता. राजकारण्यांचा मस्तवालपणा दाखविणारे त्यांचे हे संवाद म्हणूनच आजही लक्षात रहातात. ''आमच्या घराण्यात गलास फोडल्याचे बारा आणे कधी कुणी भरले नाहीत. पोरानं दारु प्यावी, मास्तराला मारावं, हवालदाराच्या कानफटात ठेऊन द्यावी आन बापानं नायतर आज्यानं सगळं नुसतं करंगळीवर निभाऊन न्यावं....'' आजही काही राजकारणी मंडळींचा 'माज' यापेक्षा वेगळा असतो काय? हा संवाद वाचला तरीही राग येतो, मग सादर करणार्‍या निळूभाऊंनी तो सादर केला तर त्याची तीव्रता काय असेल याचा अंदाजच केलेला बरा.

बेरकीपणा, मस्तवालपणा, उर्मटपणा, माज नि वरचढ ठरण्याची राजकारणी वृत्ती निळूभाऊंनी आपल्या खलनायकी व्यक्तिमत्वात कशी आणली असेल? निरिक्षणातून तर नक्कीच. कारण खेड्यातूनच पुढे आलेल्या निळूभाऊंनी हे जग बघितले होते. काहींच्याच हातात केंद्रित झालेली सत्ता, त्यांचा माजही त्यांनी बघितला होता. ज्या नजरेतून त्यांनी हे पाहिले, त्या नजरेतून हे सारं देहात भिनवत निळूभाऊंनी प्रेक्षकांसमोर आणलं आणि गारूड केलं. म्हणूनच निळू फुले ही व्यक्तीच अशी खलनायकी असावी ही समजूत दृढ करण्यात ते यशस्वी ठरले. निळूभाऊ काही कारणपरत्वे गावोगाव गेल्यानंतर तिथल्या शिक्षिका, नर्स त्यांच्यापासून चार हात दूर रहायच्या. या घटना निळूभाऊंच्या व्यक्तिरेखेतल्या अस्सलपणाचे द्योतक आहे.

खलनायक ही निळूभाऊंभोवती पडलेली मर्यादा खरीच. पण त्यातही त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. खलनायक म्हणून त्यापेक्षा वेगळा विचार आपण आजही करू शकत नाही हे निळूभाऊंच्या भूमिकांचे यश आहे नि पगडाही. सरपंच आणि पाटील या व्यक्तिरेखांना निळूभाऊंचे कोंदण लाभले आहे. म्हणूनच आजही या व्यक्तींकडे आपण पडद्यावरच्या निळूभाऊंकडे बघण्याच्या नजरेतूनच बघतो, ही त्यांच्या भूमिकांना नि त्यांच्यातल्या कलावंताला मिळालेली पावती आहे. त्यांचा हा प्रभाव पुसता येईल, अशी शक्यता आज घडीला तरी दिसत नाही.

वेबदुनिया वर वाचा