शाओमी देणार वन प्लसला टक्कर, नव्या फोनचा टीझर लाँच

गुरूवार, 16 मे 2019 (15:35 IST)
शाओमी मोबाइल कंपनी आता वन प्लसला टक्कर देणार आहे. शाओमी लवकरच आपला नवा फोन लाँच करणार आहे. शाओमीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनू जैन यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.
 
शाओमी भारतात आपला फ्लॅगशीप मोबाइल लाँच करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. शाओमीकडून त्यावर अधिकृतपणे काही भूमिका आली नव्हती. मात्र, मनू जैन यांच्या ट्विटमुळे शाओमी आपले दोन मोबाइल लाँच करणार असल्याच्या शक्यतेवर‍ शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. या ट्विटमध्ये 'वन प्लस'चे अभिनंदन करतानाच शाओमीच्या नव्या फोनची घोषणा करण्यात आली आहे. ट्विटमध्ये नव्या मोबाइलबद्दल फारसे काही नमूद नसले तरी या मोबाइलचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 855 असण्याची शक्यता आहे. हा फोन 'रेडमी के20' असणार आहे. दुसर्‍या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 700 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
 
'रेडमी के20' या फोनमध्ये डिस्प्लेमध्येच फिंगरप्रिंट सेन्सर आणि सुपर वाइड अँगल कॅमेरा असणार आहे. त्याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 6.39 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. यामध्ये 48 मेगापिक्सलसह 8 आणि 13 मेगापिक्सलचे कॅमेरे असणार आहेत. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. स्मार्टफोनमध्ये अ‍ॅण्ड्राइड 9 पाईसह 8 जीबी रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असू शकतो. 'रेडमी के20'च्या लाँचिंगबद्दल अद्याप काही माहिती समोर आली नाही. हा फोन पहिल्यांदा चीनमध्ये लाँच करण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती