Navratri 2024 दुर्गा देवीचे आठवे रूप महागौरी

गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (05:00 IST)
दुर्गा देवीचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय महागौरी स्वरूपात दुर्गा देवीच्या आठव्या दिवशी पूजा केली जाते नवरात्रीचा आठवा दिवस देवी महागौरीला समर्पित आहे. महागौरी या देवीचे मंदिर पंजाब मधील लुधियाना मध्ये स्थित आहे. या दिवशी महागौरी मातेची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच देवीआईला प्रसन्न करण्यासाठी तिची विधीप्रमाणे पूजा करावी. म्हणजे देवीआईची विशेष कृपा होते  
 
महागौरी पूजन विधी-
अष्टमी तिथीला सकाळी स्नान-ध्यान पश्चात कलश पूजन करुन देवीची विधीपूर्वक पूजा करावी. तसेच या दिवशी देवीला पांढरे फुलं अर्पित करावे अष्टमीला देवीला शिरा-पुरी, भाजी, काळे चणे आणि नारळाचे नैवेद्य दाखवावा. अष्टमी पूजनाच्या दिवशी कन्या भोजन घालावे.
 
दुर्गामातेचे आठवे रूप आहे महागौरी, गौर अर्थात श्वेत म्हणजे महागौरी म्हणून ओळखली जाते. महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वर-मुद्रा आहे. महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.
 
आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता-
जन्म कोटि लगि रगर हमारी।
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।
 
या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तसेच तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्वाधिक कल्याणकारी आहे. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकीक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्ताचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. तिला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे.
 
महागौरी स्तुती मंत्र-
श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।।
 
महागौरी प्रिय नैवेद्य आणि पुष्प-
माँ दुर्गेचे आठवे रूप महागौरीला मोगर्‍याचं फुलं खूप प्रिय आहे. अशात साधकाने या दिवशी मातेच्या चरणी हे फूल अर्पण करावे. यासोबतच देवी आईला नारळ बर्फी आणि लाडू अर्पण करावेत. कारण नारळ हे आईचे आवडते नैवेद्य मानले जाते.
 
पूजेचे महत्व-
आई महागौरीची पूजा केल्याने लग्नात येणारे सर्व संकट दूर होतात. 
देवी आईच्या आशीर्वादाने उत्तम जोडीदार मिळतो.
देवीची पूजा केल्याने येणारे सर्व संकट दूर होऊन सर्व पापांपासून मुक्ती मिळते. 
देवीच्या आशीर्वादाने सौख्य, ऐश्वर्याची प्राप्ती होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती