Navratri 2024 दुर्गा देवीचे सहावे रूप कात्यायनी

मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (05:00 IST)
दुर्गा देवीचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. तसेच दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना देखील केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो.  
 
दुर्गा मातेचे सहावे रूप असलेली कात्यायनी देवीचे मंदिर कर्नाटक मधील अंकोला जवळ एवेर्सा मध्ये कात्यायनी बाणेश्वरी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. ऋषी कात्यायन यांची मुलगी असल्यामुळे देवीच्या या रुपाला कात्यायनी म्हणतात.  
 
कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार फळाची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकीक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो. तो रोग, भय, दु:ख आणि संतापापासून मुक्त होतो.  
 
कात्यायिनीदेवीच्या पूजेचे महत्त्व-
देवी कात्यायनीची उपासना फलदायी असते, असे मानले जाते की देवी कात्यायनीची पूजा केल्याने अर्थ, धर्म,काम आणि मोक्ष प्राप्ती होते. देवीभागवत पुराणानुसार देवीच्या या रूपाची पूजा केल्याने शरीर तेजस्वी होते. तसेच गृहस्थ जीवन सुखी राहते आणि साधकाचे व्याधी, दुःख, शोक, भय यांचा समूळ नाश होतो. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी देखील मां कात्यायनीची पूजा केली जाते. कात्यायिनी देवी सर्व नकारात्मक शक्तींचा अंत करते.
 
पूजेचा विधी-
नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी सर्वप्रथम स्नान आणि ध्यान केल्यानंतर शुभ रंगांची वस्त्रे परिधान करून कलशाची पूजा करावी आणि त्यानंतर माता दुर्गेचे रूप माता कात्यायनीची पूजा करावी. पूजा सुरू करण्यापूर्वी देवी आईचे स्मरण करून हातात फुले घेऊन संकल्प करावा. यानंतर ती फुले देवी आईला अर्पण करा. त्यानंतर देवीला कुमकुम, अक्षत, फुले इत्यादी सोळा अलंकार अर्पण करावेत. देवीला नैवेद्य दाखवावा. देवी समोर तुपाचा दिवा लावावा आणि देवीची आरती करावी.   
 
पूजा मंत्र
1.या देवी सर्वभूतेषु माँ कात्यायनी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
 
2.चंद्र हासोज्जवलकरा शार्दूलवर वाहना|
कात्यायनी शुभंदद्या देवी दानवघातिनि||

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती