नाशिक : सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाचे नियोजन पूर्ण

बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (20:53 IST)
साडे तीन शक्तीपीठा पैकी एक असलेल्या आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगीमातेच्या नवरात्रोत्सवास 15 ऑक्टोबरपासून सुरवात होणार आहे. त्यादृष्टीने नियोजनाबाबत बुधवारी  अधिकारी, ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक सप्तशृंग गडावर झाली.
 
साडे तीन शक्तीपीठा पैकी एक असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवी नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर व कोजागिरी पोर्णिमा (कावड यात्रा) उत्सव 27 व 28 ऑक्टोबरला होणार आहे. त्यादृष्टीने नवरात्रोत्सव नियोजन व कायदा व सुव्यवस्था राखणे, भाविकांच्या गर्दीचे नियोजन, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे योग्यप्रकारे नियंत्रण, आवश्यक ते मदतकार्य प्रक्रियेसंबंधित निर्धारित पूर्तता होण्यासाठी सप्तशृंगी निवासनी देवी ट्रस्ट कार्यालयात बैठक झाली.
 
या आधी झालेल्या आढावा बैठकीत ठरल्याप्रमाणे नियोजन करण्यात आले की नाही, याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. बैठकीचे स्वागत व सभेची प्रस्तावना विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी केले.यावेळी  ट्रस्टने भक्तांच्या सुरक्षितेसाठी अपघाती विमा उतरविला असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांची वाढती गर्दी आणि पिण्याच्या पाण्याच्या आवशकतेचा विचार करता पहिली पायरी (गणेश मंदिर), श्रीराम टप्पा (श्रीराम मंदिर), उतरती पायरी, धर्मदाय दवाखाना, शिवालय तीर्थ आदी ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात येणार आहे.
 
भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृह उभारणी, श्री भगवती मंदिर, प्रवेशद्वार व नांदुरी ते सप्तशृंग गड आदी ठिकाणी लायटींग बसविणे, यात्रा कालावधीत मोफत श्री भगवती महाप्रसाद, अग्निशमन बंब व्यवस्था, आपत्ती व्यवस्था, साफसफाई व्यवस्था, फ्यनिक्युलर रोप वे प्रकल्पसंदर्भीय गर्दी व सुलभ दर्शन, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
 
यात्रा कालावधीत खासगी वाहनांना बंदी असून, दूध वाहतुकीला प्रशासनाने पासची व्यवस्था केली आहे. यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे, असे निर्देश तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिले.
 
नवरात्रोत्सवात असे आहे  नियोजन
 
-श्री भगवती मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले
 
-नांदुरी येथे गड पायथ्याशी बसस्थानक व वाहन पार्किंग
 
-मंदिरात जाण्याचा व मंदिरातून बाहेर पडण्याचा मार्ग असे दोन स्वतंत्र मार्ग
 
-4 डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर व विविध ठिकाणी एकूण 12 हॅन्ड मेटल डिटेक्टरद्वारे भाविकांची तपासणी
 
-पहिली पायरी येथे नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र 5 मशिनची व्यवस्था
 
-पहिल्या पायरीजवळ कर्पूर कुंड व अगरबत्ती, तेल अर्पण व्यवस्था
 
-श्री भगवती मंदिर, मुख्य प्रवेशद्वार चढत्या व उतरत्या पायऱ्यांच्या ठिकाणी नियंत्रण व उद्धबोधन कक्ष
 
-भाविकांच्या मदतीसाठी टोल फ्री नंबर कार्यान्वित होणार
 
-विश्वस्त संस्था व शासकीय आरोग्य व्यवस्थेची प्राथमिक उपचार केंद्र 24 तास कार्यान्वीत
 
-भाविकांना मंदिरात सोडण्यासाठी 15 बाऱ्यांचे नियोजन करून बाऱ्या धरण्यासाठी 90 हंगामी कर्मचारी नियुक्ती
 
-अखंडित वीजपुरवठ्याहासाठी 2 जनरेट
 
-सभा मंडपात दिवस आणि रात्री 20 सुरक्षारक्षकांची नियुक्ती
 
-श्री भगवती मंदिरापासून परशुराम बालाकडे जाणारा प्रदक्षिणा मार्ग बंद
 
-गडाच्या पायथ्याशी 16 एकरचा वाहनतळ
 
-नांदुरी ते सप्तशृंगी गड 70 बस, नाशिक व अन्य विभागातून 350 जादा बसचे नियोजन
 
-सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षकांसह दोन उपअधीक्षक, 10 निरीक्षक, 15 उपनिरीक्षक, 295 कर्मचारी आणि 250 हेड कॉन्स्टेबल
Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती