नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसचं घरात जी घट बसवतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते. ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात.
एका ताटात साडी ठेवावी. आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी.
देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.
साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा. याऐवजी आपण लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा असा रंग निवडू शकता.
एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल, सोनेरी किंवा इतर.
तसचं संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोपर्याची वाटी ठेवावी.
हळद-कुंकु, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडी साखर देखील असावी.
अनेक लोक 5 वाण ठेवतात. ज्यात हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो.
नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी.
ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्तवाचं आहे. याला तांबूळ असं म्हणतात. यात सुपारी, तंबाखू नसावा.
नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.
ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.
मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाष्णीला पण देऊ शकता.