नवरात्रात अष्टमी पूजा करताना होमहवन करण्याची प्रथा आहे. जाणून घ्या पूजा विधी-
पूर्व दिशेला चौकोनी विटा रचून यज्ञवेदी तयार करावी. यज्ञकुंड असे या वेदीला म्हणतात. यज्ञकुंडात चांगली शुध्द माती व सुगंधी द्रव्ये टाकावे. या वेदीसमोर एक पाट मांडून त्यावर तांदळाचे तीन पुंजके ठेवावे. उजव्या बाजूच्या दोन पुंजक्यावर दोन तांब्याचे कलश पाणी भरुन त्यावर दोन ताम्हणे ठेऊन त्यांत तांदुळ भरुन एक- एक सुपारी ठेवावी. कलशपूजा ही वरुणदेवाची पूजा असते. डाव्या बाजूच्या तांदळाच्या पुंजक्यावर गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. कलशासमोर पाच फळे, पाच पानांचे विडे, पाच खारका, बदाम, खोबरे व नारळ ठेवावे. पाटाच्या डाव्या बाजूला मातृका म्हणून १७ सुपार्यांची स्थापना करतात. यज्ञ करण्यासाठी ब्राम्हण गुरुजींना बोलावावे. हवन विधी करण्यासाठी यजमान व त्यांची पत्नी नवीन वस्त्रे धारण करुन दोघांनी पाटांवर बसावे. नंतर गुरुजी मंत्रोच्चारण करुन हवन विधीला प्रारंभ करतात. देवीची प्रार्थना करुन संकल्प करतात.
पाण्याने भरलेल्या कलशावरील ताम्हनात तांदूळ पसरुन मध्यभागी देवीची मूर्ती स्थापन करतात. श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा या देवतांचे पूजन करतात.
हवनासाठी अग्नीची स्थापना करण्याकरिता विशिष्ट लाकडावर लाकूड घासून अग्नी प्रज्वलित केली जाते. याला अग्निमंथन म्हणतात. अग्निमंथनाचे लाकूड, तुप, लोणी, चंदनाची व आंब्याच्या झाडाची काष्ठे होमकुंडात टाकावी. हवन पूर्ण होईपर्यंत अग्नी प्रज्वलित ठेवावा.
ॐ मुखां य: सर्वदेवानां दव्यभुक् कण्यभुकं तथा । पितृणां च नमस्त्स्मै विष्णवे पावकात्मने ॥ पावकाग्नये नम: ।
या मंत्राने अग्नीची पंचोपचार पूजा करतात.
नवग्रहपूजन -
नवग्रहांच्या शांतीसाठी गंधपुष्प वाहून पूजा करतात. नंतर यज्ञकुंडामध्ये तूप, समिधा, तीळ, भात टाकून नवग्रहासाठी हवन करतात. या वेळी गुरुजी प्रत्येक ग्रहाचा मंत्रोच्चार करतात.
सप्तशती हवन
संकल्प -
श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवता प्रसन्नतार्थ च त्रितापात् सर्वबाधा प्रशमनार्थ, सर्व दोष निवारणार्थ
सर्वविध मनोरथ कामना-सिध्दयर्थ ब्राह्मण द्वारा श्रीदुर्गादेवी प्रीतये दुर्गा सप्तशती मन्त्रैर्यथाविधि हवनं च करिष्ये ॥
देवी माहात्म्य दुर्गा सप्तशती ग्रंथाचे गंधपुष्प वाहून पूजन करावे.
या मंत्राने १०८ आहुती देतात. आणि मग सप्तशतीच्या प्रत्येक श्लोकात बरोबर हवनामध्ये भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे व विडयाच्या पानाने ७०० वेळा 'स्वाहा' म्हणून आहुती देतात.
आहुती देणे पूर्ण झाल्यावर देवीला गंध, पुष्प, हळद्कुंकू वाहून धूप, दीप ओवाळून नैवेद्य दाखवतात.
यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च । तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे ॥
असे म्हणून प्रदक्षिणा घालतात. नंतर एका कुमारिकेची व सुवासिनीची पूजा करुन खणानारळाने ओटी भरतात.
प्रार्थना -
कलशातील पाणी यजमान व त्याची पत्नी आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांवर शिंपडून या सर्वांना हवनाचे पुण्य प्राप्त होवो अशी देवीला प्रार्थना करतात आणि होमकुंडातील भस्म सर्वांच्या कपाळी लावतात.
गोप्रदान -
सर्व कर्माचे फल प्राप्त व्हावे यासाठी गुरुजींना चांदीची गायीची प्रतिमा व वस्त्रे प्रदान करतात.
देवता विसर्जन -
कलशावर अक्षता वाहून गुरुजी यजमानाकडून कलश हलवतात.
यान्तुदेवगणास्सर्वे पूजामादाय पार्थिवात् इष्टकामप्रसिध्दयर्थ पुनरागमनाय च ॥
आशीर्वाद -
यजमान गुरुजींना दक्षिणा देतात आणि गुरुजी सर्वांचे कल्याण व्हावे, सुखशांती लाभावी, ऐश्वर्यवैभव प्राप्त व्हावे यासाठी आशीर्वाद देतात.