नवरात्र विशेष दर्शन : आई अंबाजोगाई योगेश्वरी मंदिर
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर बसलेले अंबेजोगाई गाव आहे.त्यात कोकणस्थांची कुलदेवी म्हणून अंबेजोगाईची योगेश्वरी प्रसिद्ध आहे. ज्या प्रकारे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माउली,ही आदिशक्तीची पूर्ण पीठे आहे त्याच प्रमाणे वणीची सप्तशृंगी आणि काही लोकांचा मते आंबाजोगाईची योगेश्वरी देखील अर्ध शक्ती पीठ आहे.
आई योगेश्वरी हे साक्षात आदिशक्तीचे घेतलेले रूप आहे.अमूर्त तांदळ्याच्या रूपातली ही योगेश्वरी कुमारिका आहे.या मागे एक किवंदंती आहे.
परळीच्या वैजनाथांचा विवाह योगेश्वरीशी निश्चित करण्यात आला. कोकणातून देवी आणि वऱ्हाडी मंडळी परळीला निघाले. लग्नाचा मुहूर्त ठरला; पण तो मुहूर्त टळून गेला आणि त्यामुळे देवीचा विवाह झाला नाही. आणि देवी कुमारिकाच राहिली. तिने परत कोकणात न जाता, आंबाजोगाईतच राहण्याचे ठरविले.तेव्हा पासून देवी योगेश्वरी तेथे वास्तव्यास आहे.
या मागे अशी आख्यायिका आहे की दान्तसूर नावाच्या दैत्याने खूप उच्छाद मांडला होता.त्या दान्तासुर दैत्याचा संहार करण्यासाठी आदिमाया आदिशक्तीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचा संहार केला.त्याच्या वध केल्यावर देवी विसावा घेण्यासाठी आंब्याच्या झाडाखाली बैसली.तेव्हा पासून ह्या जागेचे 'आंबेगोजाई' असे नाव प्रख्यात झाले.दंतासुराचा वध केला म्हणून देवीला दन्तसुर्मार्दिनी असे ही म्हणतात.
अंबाजोगाई हे क्षेत्र फार प्राचीन आहे.जयंती नदीच्या पश्चिम तटावर अंबेचे मंदिर आहे. मंदिराला तटबंदी असून उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना दरवाजे आहेत. मंदिराच्या प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. देवीचे मंदिर यादवकाळात बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धारही केला आहे मुख्य मंदिर दगडी असून, एका छोट्या गभाऱ्यात चबुतऱ्यावर अंबिकेचा मुखवटा असून. देवी उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या सभामंडपात गणपती आणि देवीची उत्सवमूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर उत्तर दिशेस होमकुंड असून, उत्सवाच्या दरम्यान होणाऱ्या शतचंडीचा होम येथे केला जातो. मंदिर परिसरात नगारखान्याजवळ दांतसुराची मूर्ती आहे. मंदिराच्या शिखरावर पाच मजली कळस आहे. उत्तम कलाकृती असलेला मराठा शैलीतील या कळसावर अनेक देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. अठरा हातांच्या गणेशाची एकमेव स्त्री रूपातील मूर्ती, देखील या कळसावर आहे.
देवीला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो. देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला, म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते.
ही देवी नवसाला पावणारी आहे.देवीच्या मंदिरात मार्गशीर्ष मधील नवरात्रोत्सव आणि शारदीय नवरात्रोत्सव हा मोठा उत्सव आहे. इथे मंदिराला रोषणाई, दिवे, पताका,फुलांच्या माळेने सजवतात.दररोज सकाळी काकड आरती, शेजारती, महाआरती, भजन, गोंधळ,जागर, श्रीसूक्त पठण, दुर्गा सप्तशती पठण , नवचंडी होम हवन, अष्टमीचा होम, केले जाते. रात्रीच्या वेळी इथे विविध गुणदर्शनाचे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. संपूर्ण नवरात्र येथे भाविकांची रेलचेल असते. आणि भाविक मोठ्या उत्साहाने नवरात्रोत्सव साजरा करतात.इथे देवीला तांबुलाचा प्रसाद अर्पण केला जातो. वर्षभर येथे भाविक देवी आईच्या दर्शनास येतात. इथे भक्तांसाठी राहण्याची सोय मठात केली जाते.
कसे यायचे-
या गावात पोहचणे अवघड आहे.येथे येण्यासाठी रेल्वेची सोय नाही तरीही भाविकांची गर्दी अफाट असते.
विमानाने
औरंगाबाद येथिल विमानतळ 230 किमी अंतरावर आहे.
रेल्वेने
सर्वात जवळचे रेल्वे स्थानक परळी आहे.
रस्त्याने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानका वरून नियमितपणे राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.