तुमच्या कडे किती जाती आहेत, याची मला कल्पना नाही. मात्र आमच्या पाच जिल्ह्यांतून जात हद्दपार झाली आहे. मी सर्वांना सांगूनच ठेवलंय की, जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन, असं नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसनं त्यांच्यावर पलटवार करत गडकरी यांना प्रश्न विचारला आहे. की मग हनुमानाची जात सांगणाऱ्यांना तुम्ही मारणार का?, मध्य प्रदेशमधल्या काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून असं ट्विट केले आहे. नितीन गडकरींच्या जातीचा उल्लेख केलेल्या विधानाचा हवाला देत काँग्रेसनं भाजपावर जोरदार टीका केली. नितीन गडकरींचं ते विधान भाजपा नेत्यांसाठीच असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी आडाखे बांधले आहेत. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी म्हणाले होते की, मी जात-पात मानत नसून आर्थिक, सामाजिक-समतेच्या आधारावर संपूर्ण समाजाचं संघटन झालं पाहिजे असे स्पष्ट केले होते. गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी पुनरुत्थान समरसता, गुरूकुलमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले होते.