सव्वा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या दाव्याची सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती ए. के. शिक्री, न्यायमूर्ती अशोक भास्कर, न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. यापूर्वीची सुनावणी 1 ऑक्टोबर 2017 रोजी झाली होती. महाराष्ट्राच्या वतीने अॅड. दातार भूमिका मांडण्याची शक्यता आहे. अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव त्यांना मदत करतील.
महाराष्ट्राकडून दाव्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे. दाव्याबाबत साक्षीदारांची निश्चिती झाली असून ते साक्षीसाठी सज्ज आहेत. खटल्यातील महाराष्ट्राचे वकील अॅड. हरिष साळवे यांनी न्यायालयात बाजू मांडावी, यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात दिल्ली आणि कोल्हापूर येथे खासदार शरद पवार यांची भेट घेण्यात आली होती.