INS विक्रांतप्रकरणी अडचणीत आलेले किरीट सोमय्या आहेत तरी कुठे?
बुधवार, 13 एप्रिल 2022 (11:38 IST)
दीपाली जगताप
INS विक्रांतसाठी निधी गोळा केल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या 'नॉट रिचेबल' असल्याचा आरोप होत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या फरार असल्याचाही दावा केला आहे.
सोमवारी (11 एप्रिल) सेशन कोर्टाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. आज (13 एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयात किरीट सोमय्या यांच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे.
उच्च न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यास सोमय्या यांना अटक होऊ शकते. म्हणूनच किरीट सोमय्या फरार आहेत का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
किरीट सोमय्या खरंच 'नॉट रिचेबल' आहेत का? पोलीस आणि अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत का? किरीट सोमय्या मोबाईल फोनवर किंवा कार्यालयात उपलब्ध आहेत का? ते भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ आला पण ते कुठे आहेत?
भारतीय नौदलातून निवृत्त झालेली विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी गोळा केला आणि त्याचा वापर व्यावसायासाठी केला असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
त्यानंतर मुंबईतील मानखूर्द येथे राहणाऱ्या बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच 58 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडूनही याचा तपास केला जात आहे.
किरीट सोमय्या गेल्या तीन दिवसांपासून संपर्कात नसल्याचा ओराप केला जात आहे. ट्विटरवर दररोज सक्रिय असणाऱ्या किरीट सोमय्या यांनी 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान एकही ट्वीट केलेलं नाही.
8 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी किरीट सोमय्या यांनी 'शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारावाईचं स्वागत करतो,' असं ट्वीट केलं होतं. त्यानंतर तीन दिवस सोमय्या 'नॉट रिचेबल' असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
तीन दिवसांनंतर सोमय्या यांनी ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट करत आपली पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. पण या व्हिडिओमध्येही त्यांनी आपण कुठे आहोत हे स्पष्ट केलेलं नाही किंवा यासंदर्भातील बातम्यांचाही उल्लेख केला नाही.
या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, "2013 मध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने विक्रांत युद्धनौका 60 कोटी रुपयात भंगारात काढण्याचा निर्णय घेतला. याचा आम्ही निषेध केला. भाजपने 10 डिसेंबरला आम्ही चर्चगेट रेल्वेस्टेशनबाहेर सांकेतिक निधी संकलनाचा तासभर कार्यक्रम केला. सुमारे 11 हजार रुपये जमले."
"गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपचे खासदार, मी स्वत: 2013 ला राष्ट्रपतींना भेटलो. राज्यपालांना सांगितलं. आज 10 वर्षांनंतर संजय राऊत सांगतात किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये ढापले, चार बिल्डरांकडून मनी लाँडरिंग करून निल सोमय्याच्या कंपनीत जमा केले. एकही कागद नाही, पुरावा नाही, पोलिसांकडे एक कागद नाही. तक्रारदार सांगतात संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे ते आले,"
या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळेबाजांना कारवाई होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही सोमय्या यांनी दिला.
किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सेशन कोर्टाने फेटाळला आहे. आता आपण मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सोमय्या यांनी स्पष्ट केलं.
किरीट सोमय्या यांचा मोबाईल नंबर डायवर्टेड?
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु त्यांच्या कार्यालयातून एका महिला कर्मचाऱ्याने फोन उचलला.
किरीट सोमय्या यांचे हे कार्यालय असल्याचं त्यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांच्याशी बोलणं होऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "किरीट सोमय्या उपलब्ध नाहीत. ते आज दिवसभर कार्यालयात येणार नाहीत. कुठे आहेत याची कल्पना नाही."
तसंच ते सोमवारी (11 एप्रिल) कार्यालयात नव्हते असंही सोमय्या यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं.
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील कार्यालयाबाहेर काही अज्ञातांनी 'भाग सोमय्या भाग' असं रस्त्यावर स्पे वापरून लिहिलं आहे.
आर्थिक गुन्हे शाखेची टीम शोध घेणार?
आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने किरीट सोमय्या यांच्या मुलुंड येथील कार्यालयाला भेट दिल्याचे समजते. किरीट सोमय्या यांच्याविषयी तपास करण्यासाठी टीम त्याठिकाणी गेल्याचं सांगण्यात येत आहे.
EOW च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "किरीट सोमय्या यांचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. गरज पडल्यास मुंबई बाहेरही आमची टीम पाठवू."
मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर तपासासाठी किरीट सोमय्या यांनी पोलिसांनी 9 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली. पण ते हजर राहिले नाहीत.
किरीट सोमय्या यांना Z सुरक्षा, 'तरीही फरार कसे?'
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारकडून Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सतत सुरक्षा रक्षक असतात.
केंद्राचे सुरक्षा रक्षक सोबत असूनही किरीट सोमय्या फरार कसे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात केंद्र सरकारला आम्ही विचारणा करू असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, "आम्ही केंद्र सरकारला विचारू की तुम्ही सुरक्षा दिलेले लोक कुठे आहेत? आरोप करणं सोपं असतं. पण स्वत:वर आरोप झाले की चौकशीचा सामना करणं याला शूर म्हणत नाहीत."
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर सातत्याने गंभीर आरोप केल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने Z दर्जाची सुरक्षा दिली होती.
Z दर्जाच्या सुरक्षा श्रेणीत यात 1 बूलेटप्रूफ गाडी, पोलिसांची एस्कॉर्ट गाडी, अधिकारी आणि 8 जवान मिळून जवळपास 20 सुरक्षा कर्मचारी असतात.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांची सुरक्षा केंद्राने काढून घ्यावी अशी मागणी केली आहे, "केंद्राला आपल्या सैनिकांविषयी काही आस्था असेल तर त्यांनी सोमय्यांची सुरक्षा काढून घ्यावी. तसंच त्यांचा तपास करून त्यांना महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात द्यावे. सोमय्या भाजप शासित राज्यात लपले असणार, ते गोवा किंवा गुजरातमध्ये असतील." अशी शक्यताही राऊत यांनी वर्तवली.
भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत का?
किरीट सोमय्या त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध नसल्याने आणि कार्यालयातही नसल्याचं सांगण्यात आल्याने आम्ही मुंबईतील काही भाजप नेत्यांना संपर्क साधला.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "सगळ्यांना अटकेपासून वाचण्याचा कायदेशीर अधिकार आहे. यात काही नवीन नाही."
तुमचा त्यांच्याशी काही संपर्क झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनाही आम्ही संपर्क साधला. व्यस्त असल्याने लगेच बोलता येणार नाही असं त्यांनी सांगितलं.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र सोमय्या पोलिसांच्या चौकशीला सामेरे जातील असा विश्वास व्यक्त केला आहे. किरीट सोमय्या धाडसी नेते आहेत असंही ते म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्यासमोर आता कोणते पर्याय?
सेशन्स कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर सोमय्या यांच्यावरील पुढील कारवाई अवलंबून असल्याचं कायदेशीर जाणकार सांगतात.
पण दरम्यानच्या काळात जोपर्यंत सोमय्या यांना अटकेपासून सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत त्यांना अटक करता येऊ शकते असं वकील आशिष चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
ते म्हणाले, "अटकपूर्व जामीन नाकारला म्हणून त्यांना आता अटक होणार असंही म्हणता येणार नाही. पण जामीन नाकारल्याने अटकेची शक्यता आणखी वाढते. तसंच त्यांच्याविरोधात ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे अशा प्रकरणी अटक होऊ शकते."
किरीट सोमय्या यांच्या विरोधात 406,420 आणि 34 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 406 कलम म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वासघात केल्याप्रकरणी लागू केलं जाणारं कलम आहे. तर 420 कलम हे फसवणुकीसाठी लागू केलं जातं.
तसंच 34 कलम हे गुन्ह्यात एकहून अधिक लोक सामील असल्यास कटकारस्थान केल्याप्रकरणी लागू केलं जातं.
वकील इंदरपाल सिंह सांगतात, "अशा प्रकरणांमध्ये पुढे 41A CRPC ची नोटीस दिली जाऊ शकते. त्यांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. तसंच या प्रकरणात अटक होण्याचीही शक्यता असते. गुन्हा सिद्ध झाल्यास जास्तीत जास्त 7 वर्षे शिक्षा होऊ शकते."
या प्रकरणात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनही मिळवता येऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
खरं तर भारतात अशा अनेक मोहिमा राबवल्या जातात ज्यासाठी नागरिकांकडून वर्गणी मागितली जाते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराबाबत गुन्हा नोंदवला जाऊ शकतो का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याविषयी बोलताना इंदरपाल सिंह सांगतात, "समजा गणेशोत्सवासाठी एखाद्या मंडळाने किंवा रहिवाशांनी वर्गणी गोळा केली. पण प्रत्यक्षात गणेशोत्सव साजरा केला नाही तर आर्थिक व्यवहारात शंका घेण्यास वाव असतो आणि आक्षेपही घेतला जाऊ शकतो."