मुलीची चाकूनं भोसकून हत्या, 'त्या' दीड मिनिटात काय घडलं, जाणून घ्या

मंगळवार, 30 मे 2023 (11:39 IST)
दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी या मृत मुलीचा प्रियकर होता. आरोपीने पीडितेला वाटेत अडवून चाकूने अनेक वार केले. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घातला.
 
पीडितेच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा झाल्या असून किमान 20 वेळा चाकूने वार केले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
 
वृत्तसंस्था एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने म्हटलंय की, आरोपीचं नाव साहिल असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
 
घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तो ट्विटरवर शेअर केलाय. याबाबत लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय. राष्ट्रीय महिला आयोग आणि दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची सूचना केली आहे.
 
याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
 
नेमकं काय घडलं?
दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाहबाद डेअरी परिसरातील जे जे कॉलनीत राहते. ती रस्त्यावरून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला.
 
हे दोघेही एकमेकांना ओळखत होते आणि रिलेशनशिपमध्ये होते. मात्र शनिवारी दोघांमध्ये भांडणं झाली.
 
पोलिसांनी सांगितलं की, पीडिता तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसासाठी निघाली होती. दरम्यान आरोपीने तिचा पाठलाग करत तिला अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिच्या डोक्यात दगडही घातला.
 
पीडितेला रुग्णालयात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार आरोपीवर शाहबाद डेअरी पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी काय सांगितलं?
दिल्ली पोलिसांचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजा बंथिया म्हणाले, "पीडित मुलगी आणि साहिल (आरोपी) एकमेकांना ओळखत होते. साहिल 20 वर्षांचा आहे."
 
पीडितेच्या कुटुंबीयांनी यापूर्वी साहिलविरुद्ध तक्रार केली होती का? या प्रश्नावर डीसीपी राजा बंथिया सांगतात, "नाही. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी पीडितेचा मृत्यू झाल्याचं समजलं. शवविच्छेदनानंतर इतर जखमांबाबत माहिती मिळेल. तिच्यावर अनेकवेळा वार झाले. मला वाटतं की आरोपीने 20 पेक्षा जास्त वार केले असावेत."
 
हत्येनंतर साहिल पळून गेला होता. पोलिसांनी आरोपी साहिलला उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर मधून अटक केली आहे.
 
दिल्लीचे पोलीस उपायुक्त सुमन नलवा यांच्या माहितीनुसार, पोलीस आरोपीचा शोध घेत होते. त्याचवेळी उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथे आरोपीला अटक करण्यात आली.
 
उपायुक्त सुमन नलवा सांगतात की, "आरोपीचं नाव साहिल असून तो एसी आणि फ्रीज मेकॅनिक म्हणून काम करायचा."
 
दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी दीपेंद्र पाठक म्हणाले, "आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 16-17 वर्षांची असून आरोपी साहिल 19-20 वर्षांचा आहे. आरोपी व मृत मुलगी रिलेशनशिपमध्ये होते. पण काल परवा दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. साहिलने रागात तिचा निर्घृण खून केला. दिल्ली पोलीस या प्रकरणाचे ठोस पुरावे गोळा करत आहे.."
 
मुलीला वाचवण्यासाठी कोणी आलं का नाही?
रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
घटनेवेळी काही लोक उपस्थित होते मात्र कोणीही हस्तक्षेप केला नसल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
 
स्पेशल सीपी पाठक सांगतात, "हा असंवेदनशीलतेचा कळस आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथे असे गुन्हे घडत असतील तर आपण हस्तक्षेप करायला हवा. निदान आरडाओरड करून घटना थांबविण्याचा प्रयत्न करा."
 
माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीरनेही या प्रकरणावर राग व्यक्त केला आहे.
 
गौतम गंभीरने ट्विट करत म्हटलंय की, "जर तुमच्या बहिण किंवा मुलीवर असा हल्ला झाला असता तरी हे लोकं असेच चालत, बघत पुढे गेले असते का?"
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय.
 
अरविंद केजरीवाल म्हणाले की, "दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. हे अत्यंत खेदजनक व दुर्दैवी आहे. गुन्हेगार निडर झालेत. त्यांना पोलिसांचा धाक उरला नाही. एलजी साहेब, कायदा आणि सुव्यवस्था तुमची जबाबदारी आहे, काहीतरी करा. दिल्लीतील लोकांची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे."
 
महिला आयोगाची भूमिका काय?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यास सांगितलं आहे.
 
त्या म्हणाल्या की, या प्रकरणी महिला आयोगाने देलिना खोंगडप यांच्या अध्क्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली आहे.
 
दुसरीकडे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजवणार असल्याचं म्हटलंय.
 
त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, "दिल्लीतील शाहबाद डेअरी जवळ एका अल्पवयीन निष्पाप मुलीला भोसकून ठार मारण्यात आलंय. दिल्लीत अत्याचार करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय, गुन्हेगार शेफारलेत. पोलिसांना नोटीस बजावत आहोत."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती