24 सप्टेंबर 2021... कोर्टरुम 207... दिल्लीमधल्या रोहिणी कोर्टाचा परिसर
गँगस्टर जितेंद्र मान गोगीला न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. कोर्टरूममध्ये अनेक वकील उपस्थित होते.
खटल्याची सुनावणी सुरू होण्याच्या आधीच वकिलांचा काळा कोट घातलेल्या दोघा जणांनी पिस्तूल बाहेर काढून गोगीवर गोळ्या झाडायला सुरूवात केली.
कोर्टाच्या आत आणि बाहेर गोंधळ उडाला. दिल्ली पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. 27 गोळ्या चालवल्यानंतर जितेंद्र मान गोगी आणि त्याच्यावर हल्ला करणारे दोन्ही हल्लेखोर मारले गेले.
दिवसाढवळ्या राजधानी दिल्लीत, न्यायालयात झालेल्या एका गँगस्टरच्या हत्येने खळबळ उडवली होती. कारण त्याचवेळी कोर्टाच्या परिसरात इतर 68 प्रकरणांची सुनावणी सुरू होती.
2 मे 2023 तळघरातली खोली, जेल नंबर 8, तिहार जेल, दिल्ली
दिल्ली पोलिसांच्या एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, “सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिहार जेलमधल्या आपल्या बराकीतच असलेल्या गँगस्टर सुनील बालयान उर्फ टिल्लू ताजपुरियावर जीवघेणा हल्ला झाला होता.”
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी पहिल्या मजल्यावरच्या आपल्या बराकीतून तळघरातील खोलीत पोहोचण्यासाठी बेडशीटचा दोरीसारखा वापर केला होता. त्यांनी लोखंडाची जाळी आणि तुरुंगातल्याच तोडलेल्या सळ्यांनी मारून मारून टिल्लू ताजपुरियाच्या शरीरावर केवळ 15 मिनिटांत 90 वार केले होते.
या दरम्यान तुरुंगातील रक्षकांना टिल्लूच्या किंकाळ्या ऐकू आल्या. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या टिल्लूला आधी तिहार जेलमधल्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर अॅम्ब्युलन्सने दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
रोहिणी कोर्ट परिसरात जितेंद्र गोगीवर झालेल्या हल्ल्यामागे टिल्लू ताजपुरियाचाच हात असल्याचं सांगितलं गेलं होतं आणि आता तिहारमध्ये झालेल्या हल्ल्यामागे जितेंद्र गोगी याच्या मृत्यूचा बदला घेण्याचा हेतू होता.
जितेंद्र गोगीचा सहकारी मानला जाणारा गोल्डी ब्रार, जो सध्या कॅनडामध्ये लपला असल्याचं सांगितलं जात आहे, त्याने एक कथित फेसबुक पोस्ट लिहून या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
अर्थात, हे गोल्डी ब्रारचं अधिकृत फेसबुक अकाउंट आहे की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये.
गोल्डी ब्रारने ज्या लोकांची नावं लिहून गोगीच्या हत्येचा बदला घेतल्याबद्दल स्तुती केली आहे, पोलिसांच्या सूत्रांनीही त्या चार नावांना दुजोरा दिला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आशियातील सर्वांत मोठा तुरुंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिहारमध्ये झालेल्या हत्येचे पडसाद उमटणं स्वाभाविक होतं.
पहिला प्रश्न
टिल्लू आणि गोगी गँगमध्ये एका दशकाहून अधिक काळापासून वैर आणि रक्तपात चालू आहे. अशावेळी टिल्लू आणि गोगी गँगच्या कथित सदस्यांना तुरुंगात एकमेकांच्या इतक्या जवळ का ठेवलं गेलं?
टिल्लू आणि गोगी हे दोघेही दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी. तिथे श्रद्धानंद कॉलेजच्या निवडणुकीत दोघांमध्ये पहिल्यांदा संघर्षाची ठिणगी पडली. तिथून त्यांचा वैमनस्याचा इतिहास सुरू झाला.
ताजपुरियाला केवळ दोन आठवडे आधीच मंडोली तुरूंगातून तिहार जेलमध्ये हलविण्यात आलं होतं.
दुसरा प्रश्न
तुरुंगातील वॉर्डमध्ये अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, चोवीस तास पहारेकरी आहेत.
पण तरीही गोगी गँगचे कथित सदस्य लोखंडी ग्रिल कापत राहिले आणि कोणाचंच लक्ष कसं गेलं नाही? त्यांच्यापर्यंत इतकी धारदार शस्त्रं आणि अवजारं पोहोचली कशी?
तिसरा आणि सर्वांत महत्त्वाचा प्रश्न
हल्लेखोर पंधरा मिनिटं टिल्लूवर वार करत होते, त्यावेळी तिथे एकही गार्ड, पहारेकरी कसा उपस्थित नव्हता? तुरुंगातील पहारेकऱ्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी एवढा वेळ का आणि कसा लागला?
काही वर्षांपूर्वी दिल्ली पोलिसमधील एसीपी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजबीर सिंह यांनी मला सांगितलं होतं की,
“एखादा क्रिमिनल किंवा गँगस्टर तुरुंगात जाऊन आपली गँग पुन्हा चालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला खूप हतबल झाल्यासारखं वाटतं. ते तुरुंगात स्वतःला सुरक्षितही समजतात आणि आपल्या चेल्यांनी तिथेच राहून आपली सुरक्षा आणि सेवा करावी हा खटाटोपही करत राहतात.”
तिहार तुरुंगात गँगस्टर्सचं नेटवर्किंग?
तिहार तुरुंग सुरुवातीला जितका प्रसिद्ध होता, तितकीच जास्त स्पष्टीकरणं आता त्यांना द्यावी लागत आहेत. गेल्याच महिन्यात तिहार तुरुंगात गँगस्टर प्रिन्स तेवतियाची हत्या झाली होती आणि त्याच्या शरीरावर चाकूसारख्या तीक्ष्य हत्याराने आठ खोलवर वार केले होते.
2021 मध्ये द प्रिंट न्यूज वेबसाइटने म्हटलं होतं की, दिल्लीच्या तिहार जेलमधून एक-दोन नाही, तर तब्बल सात गँगस्टर आपापल्या टोळ्या चालवत आहेत.
2021 मध्ये तिहार जेलमध्ये गँगस्टर अंकित गुज्जरचा मृतदेह मिळाला होता आणि सीबीआयच्या तपासात एका तुरुंग अधिकाऱ्याविरोधात आरोप ठेवण्यात आले होते.
माजी आयपीएस अधिकारी यशोवर्धन आझाद यांचं म्हणणं आहे की, जोपर्यंत व्यवस्थेतून भ्रष्टाचाराचं उच्चाटन होत नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहणार.
त्यांनी पुढे म्हटलं, “तुरुंगातील श्रीमंत कैद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून अधिकारी-कर्मचारी निलंबित झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण त्यानंतर होतं काय? लहान-मोठी कारवाई, दंड किंवा निलंबनानंतर त्यांना सेवेत पुन्हा रुजू करून घेतलं जातं किंवा त्यांची बदली होते...बस्स!”
बीबीसीने तिहार तुरुंगाचे महासंचालक संजय बेनीवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. मात्र त्यांच्या कार्यालयाने तपासाचे आदेश दिले आहेत. दिल्ली सरकारनेही एका न्यायाधीशांच्या नेतृत्वात चौकशी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात संजय बेनिवाल यांनी म्हटलं होतं की, दिल्लीतील तीन मोठ्या तुरुंगातून त्या महिन्यात 348 मोबाइल फोन आणि त्याचे चार्जर जमा केले होते.