अरुंधती रॉय हिंदू राष्ट्रवाद आणि नरेंद्र मोदींबाबत काय म्हणाल्या?
रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (17:11 IST)
प्रसिद्ध लेखिका आणि बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती रॉय यांनी 'द वायर' संकेतस्थळासाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हिंदू राष्ट्रवादाची विचारधारा ही विभाजनकारी आहे आणि देशाची जनता या अजेंड्याला यशस्वी होऊ देणार नाही, असं अरुंधती रॉय म्हणाल्या आहेत.
त्या पुढे म्हणाल्या, "भाजप हा फॅसिस्ट विचाराचा पक्ष असून एक दिवस देश त्यांना तीव्र विरोध करेल."
"मला भारतीयांवर विश्वास आहे. मला वाटतं की देश या अंधकारातून नक्की बाहेर येईल. मोदींच्या आवडत्या एका उद्योगपतीने श्रीमंतीच्या शर्यतीत दुसऱ्या आवडत्या उद्योगपतीला मागे टाकलं आहे. अदानींचे साम्राज्य 88 अब्ज डॉलर तर अंबानींची संपत्ती कदाचित 87 अब्ज डॉलर एवढी आहे. अदानींची संपत्ती गेल्या केवळ एका वर्षात 51 अब्ज डॉलरने वाढली आहे आणि या काळात भारतातले लोक गरिबी, उपासमार आणि बेरोजगारीने त्रस्त होते," असं त्या म्हणाल्या.
"मोदी सरकार आल्यानंतर देशात विषमता आणखी वाढली आहे. देशातील 100 लोकांकडे भारताचा 25 टक्के जीडीपी आहे. उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने अचूक मत व्यक्त करत म्हटलं होतं की, देश केवळ चार लोक चालवतात, दोघे विकतात आणि इतर दोघे खरेदी करतात. हे चारही जण गुजरातचे आहेत," असंही त्या म्हणाल्या.
अरुंधती रॉय यांनी पुढे म्हटलं, "अंबानी आणि अदानी यांच्याकडे पोर्ट, खाणी, मीडिया, इंटरनेट, पेट्रोकेमिकल्ससहीत अनेक गोष्टींचे एकाधिकार आहेत. राहुल गांधी श्रीमंत आणि गरीब भारताबद्दल बोलतात, तर ओवेसी द्वेष आणि प्रेमाच्या गोष्टी करतात. पण ही सगळी मंडळी कॉर्पोरेट घराण्यांसोबत गेल्या अनेक काळापासून आहेत."
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, या दाव्यावरही अरुंधती रॉय यांनी प्रश्न उपस्थित केला.
त्या म्हणाल्या, "मोदी सरकारच्या कार्यकाळात लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला प्रसारमाध्यमं, तसंच न्यायलय, गोपनीय संस्था, लष्कर आणि शिक्षण संस्था यांच्यावरही हिंदू राष्ट्रवादी विचारधारेचा प्रभाव दिसून येत आहे."
संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा, कृषी कायदे तसंच कलम 370 हटवण्याची प्रक्रिया असेल हे सारं काही राज्यघटनेविरोधी असल्याचं दिसून आलं कारण यामुळे लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम झाला असल्याचं त्या म्हणाल्या.
अरुंधती रॉय म्हणाल्या, "पंतप्रधान कार्यालयाचा दुरुपयोग स्वत: त्यांच्याकडूनच केला जात आहे. भाजपने लोकांना अशाप्रकारे संभ्रमावस्थेत टाकलं आहे की भाजप म्हणजेच देश असा त्यांचा समज झाला आहे. तुम्ही भाजपवर टीका केली तर तुम्ही देशावर टीका करत आहात असा अर्थ काढला जातो. भाजप महान तर देश महान, असं भासवलं जातं. हे अत्यंत धोकादायक आहे. देशात लोकशाही हळूहळू संपुष्टात आणली जात आहे."
भारत एक धर्मनिरपेक्ष देशाकडून आता एक हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करत आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना अरुंधती रॉय म्हणाल्या, "अनेक धर्मसंसदांमध्ये मुस्लिमांच्या नरसंहाराचे आवाहन करण्यात आलं. हिंदूंना शस्त्र हातात घेण्यासाठी सांगितलं गेलं. या प्रकरणातले मुख्य आरोपी यती नरसिंहानंद यांना नुकताच जामीन मिळाला. केवळ सरकारच नाही तर न्यायालये सुद्धा याचा भाग आहेत. या देशात कवी, लेखक, प्राध्यपक, वकील तुरुंगात आहेत आणि जी व्यक्ती उघडपणे नरसंहार करण्याचं आवाहन करते त्यांना जामीन मिळतो."
न्यायालयाच्या निकालांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, "आता हिजाब वादग्रस्त प्रकरणातही तुम्ही बघा, तात्पुरत्या काळासाठी का होईना पण न्यायालयाने हिंदूंच्या बाजून आदेश दिला. वर्गात विद्यार्थिनीला हिजाब घालण्याची परवानगी मिळावी की नाही यावर चर्चा होतेय पण पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री घटनात्मक पदांवर असूनही भगवी शाल गळ्यात घालतात. हे सरकार देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हे लपून राहिलेलं नाही."
मॉब लिचिंगच्या घटनांबाबत त्या म्हणाल्या, "आपण कायमच अमानवी राहिलो आहोत. ज्या देशात अशा प्रकारची जाती व्यवस्था अस्तित्वात आहे तो देश अमानवीयच आहे. ही एक अशी व्यवस्था आहे जिथे कायम हिंसा होण्याचा धोका आहे."
भारत फॅसिस्ट देश बनला आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अरुंधती रॉय म्हणाल्या, "मी असं नाही म्हणणार की भारत एक फॅसिस्ट देश आहे. पण इथले सरकार आणि RSS देशाला फॅसिस्ट बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे."
"यात ते यशस्वी होतील असं मला वाटत नाही. या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल असं एकंदरीत दिसतं पण देशातील जनताच हा प्रयोग यशस्वी होऊ देणार नाही असं मला वाटतं. दोन वर्षांपूर्वी आपण फॅसिस्ट बनण्याची शक्यता आजच्या तुलनेत अधिक होती. परंतु शेतकरी आंदोलनासारख्या दीर्घकालीन आंदोलनामुळे भारत याचा सामना करताना दिसत आहे," असंही त्या म्हणाल्या.
"देश फॅसिस्ट बनण्याचा धोका कमी झाला असला तरी भाजपचा 2022 मध्ये उत्तर प्रदेश निवडणुकीत पराभव झाला, तर सांप्रदायिक हिंसाचराला प्रोत्साहन देऊन ते आपला अजेंडा यशस्वी करण्याचा प्रयत्न करू शकतात. जर भाजपचा पराभव झाला तर विजयी झालेल्या सरकारला सतर्क रहावं लागेल. एक ना एक दिवस मोदींना पराभवाचा सामना करावाच लागेल, मग तो कधीही करावा लागू शकतो," असंही अरुंधती रॉय म्हणाल्या.