करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील महाविद्यालयं उघडण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार आहे. ही माहिती विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC ने दिली आहे. सध्या महाविद्यलयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयं ऑगस्टमध्ये सुरु होणार तर नव्या विद्यार्थ्यांसाठी ही महाविद्यालयं १ सप्टेंबरपासून सुरु होणार असं यूजीसीने स्पष्ट केलं आहे.
मागील वर्ष म्हणजेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी अपूर्ण राहिलेला पाठ्यक्रम ऑनलाइन/ डिस्टन्स लर्निंग/ सोशल मीडिया/ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग यांच्या माध्यमातून ३१ मे २०२० पर्यंत शिकवण्यात येऊन पूर्ण करण्यात यावं तसेच इतर शैक्षणिक कार्य जसे प्रोजेक्ट रिर्पोट, इंटर्नशीप रिपोर्ट, ई लेबल्स, इंटरनल वेल्यूशन आणि असाइनमेंट्स हे सगळं १ जून ते १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावं, असं विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटलं आहे. यानंतर होणाऱ्या परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घेतल्या जातील. तसंच या परीक्षांचे निकाल ३१ जुलै २०२० रोजी जाहीर केले जातील.