तीन मुलींचा कुपोषणामुळे मृत्यू

गुरूवार, 26 जुलै 2018 (08:38 IST)
दिल्लीतील मंडावली भागात तीन मुलींचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या मुली दोन,चार आणि आठ वर्षांच्या आहेत. बुधवारी या मुलींचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. त्यामुळे त्यांचा मृत्यू कुपोषण किंवा भुकेमुळे झाल्याचे निप्षन्न झाले आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकारने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या मुलींचे वडील मजुरी करतात. या घटनेनंतर ते बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. तर या मुलींची आई दीर्घ काळापासून आजारी आहे.
 
या मुलींचे वडील मंगळवारी काम शोधण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते परत आलेच नाहीत. घराबाहेर वडिलांची वाट बघत बसलेल्या मुलींची तब्येत खालावली होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांना पाणी पाजले. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालवली. त्यानंतर या मुलींना जीटीबी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर मुलींना मृत घोषित केले. या मुलींच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याचे पोलीस उपायुक्त पंकज सिंह यांनी सांगितले. न्यायवैद्यक पथकाने घराची तपासणी केली असता त्यांच्या घरात काही औषधे सापडली. मुलींच्या वडिलांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती