‘बोट बुडाली आणि माझी बायको, चार मुलींसकट कुटुंबातले 11 लोक बुडाले’
रविवार, 14 मे 2023 (10:12 IST)
7 मे 2023 च्या संध्याकाळी कुन्नुमल सैतलवीने त्याच्या घराजवळ असलेल्या किनाऱ्यावर अँम्ब्युलन्सचे आवाज ऐकले आणि काहीतरी अघटित घडल्याची जाणीव त्यांना झाली.
48 वर्षीय सैतलवी त्यांच्या कुटुंबियांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो पण काही फायदा झाला नाही.
सैतलवी म्हणतात, “मी त्यांना तीन वेगवेगळ्या मोबाईलवर फोन केले. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.”
त्यांच्या कुटुंबातले अनेकजण त्या दिवशी घराजवळ असलेल्या प्रसिद्ध थुवल थिरम नावाच्या एका पर्यटनस्थळावर गेले. हे ठिकाण मल्लापुरम जिल्ह्यातल्या तानूर गावात आहे.
त्या रात्री सैतलवी यांना भीषण बातमी कळली
त्या रात्री तिथे एक बोट बुडाली होती. या दुर्घटनेत त्यांच्या कुटुंबातल्या 11 जणांचा मृत्यू झाला. त्यात त्यांची बायको आणि चार मुलींचा समावेश होता. या दुर्घटनेत एकूण 22 लोकांचा मृत्यू झाला होता.
सैतलवी आणि त्यांचा भाऊ कुन्नुमल सिराज त्यांच्या कुटुंबाबरोबर पुथ्नाकड्डपुरम नावाच्या एका गावात राहतात. थुवल थीरमपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर त्यांचं घर आहे.
ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी त्यांची बहीण त्यांच्या घरी आली होती.
त्यांनी त्यांच्या दत्तक घेतलेल्या भावाला कुन्नुमल जबीरलाही बोलावलं होतं. त्यांच्या शेजारी राहणारी अशिफा आणि तिची दोन मुलंसुद्धा बोटीची सफर करायला त्यादिवशी निघाले होते. असा एकूण 19 जणांचा गट रविवारी संध्याकाळी निघाला होता.
सैतलवी म्हणतात की त्यांनी त्या जागी कुटुंबियांची भेट घेतली आणि नंतर एका मित्राला भेटायला निघून गेले.
“ते ज्या वेळी बोटीत बसणार ती वेळ फारशी सुरक्षित नाही असं मी त्यांना सांगितलं होतं.” ते सांगतात.
शेजारी राहत असलेली अशिफा त्यादिवशी त्या कुटुंबाबरोबर होती. ती म्हणाली की हा सगळा गट घरी परतणार होता मात्र त्याचवेळी बोटचालकाने तिकीटांवर मोठी सूट दिली तसंच लहान मुलांना फुकट तिकीट देण्याचं आमिष दाखवलं.
“ती अतिशय आकर्षक ऑफर होती. आम्ही ती स्वीकारली पण सुरक्षेच्या कारणास्तव मी शेवटच्या क्षणी नाही म्हटलं,” ती सांगते.
सैतलवीचं कुटुंब मात्र त्या डबल डेकर बोटमध्ये बसलं.
काही मिनिटानंतर अशिफाला अपघात झाल्याचं कळलं. ती तेव्हा किनाऱ्यावर तिच्या कुटुंबियांची वाटच पाहत होती. तिला प्रचंड धक्का बसल्याचं ती सांगते.
त्यादिवशी त्या बोटमध्ये 50 लोक होते असं सांगण्यात येतं. बोटच्या क्षमतेपेक्षा दुप्पट माणसं त्या दिवशी बोटीत बसली होती.
सूर्यास्त झाल्यानंतर पाण्यात न्यायला बोट चालकाला परवानगी नव्हती अशी बातमी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते बोटीत अतिरिक्त प्रवासी बसल्याने बोट बुडाली. अनेक जण बोटीच्या आतच अडकून पडले. तसंच रात्रीची वेळ असल्यामुळे बचावकार्यात मोठा अडथळा आल्याच्या बातम्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिल्या
ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा सैतलवी त्यांचा मित्र एन.पी कोया यांच्या गच्चीवर होते. जेव्हा कुटुंबियांना फोन लागले नाही तेव्हा ते दोघे किनाऱ्यावर गेले.
“माझ्या कुटुंबियांना काहीतरी झाल्याची भीती मला तेव्हाच वाटली होती.” ते म्हणाले.
किनाऱ्यावर ते एका बोटीत बसले आणि अपघातातून लोकांना वाचवायला निघाले.
कोया सांगतात, “जेव्हा आम्ही आमच्या छोट्या नावेतून तिथे पोहोचलो तेव्हा अनेक लोक तिथे बचावाकार्यासाठी आल्याचं आम्हाला दिसलं. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा सैतलवी अतिशय गोंधळलेला होता.”
सैतलवी यांना लगेच लक्षात आलं की आपलं कुटुंब इथे अडकलं आहे. त्यांनी तात्काळ पाण्यात उडी मारली आणि एक मृतदेह बाहेर काढला. तो त्यांच्या भाचीचा होता.
“ज्या क्षणी सैतलवीला हे कळलं त्याचा सगळा आत्मविश्वास हरवला,” असं कोया सांगत होते. त्यानंतर सैतलवी यांना किनाऱ्यावर आणलं. त्यांना प्रचंड धक्का बसला होता.
सैतलवी यांना चार मुली होत्या आणि सिराज यांना तीन मुली होत्या आणि आठ महिन्याचं एक बाळ होतं. सिराज आणि सैतलवी यांच्या बायकापोरांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांचा भाऊ जबीर याचीही बायको आणि मुलगा या अपघातात मरण पावले.
या कुटुंबातले चार लोक मात्र बचावले - त्यांची बहीण नुसरत, त्यांची दीड वर्षांची मुलगी, जबीरचे दोन मुलं जर्शा आणि जन्ना. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
सैतलवी यांची भाची हबिबा केपी म्हणाली की त्यांच्या मुली त्यांची ताकद होत्या. “मुली त्याला नेहमी सांगायच्या की त्या चांगला अभ्यास करून चांगल्या नोकऱ्या मिळवतील,” असं त्या म्हणाल्या.
त्याच्या मोठ्या मुलीला हसनाला डॉक्टर व्हायचं होतं. ती तिच्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होती.
हबीबा म्हणते की ही लोक गेल्या तीन वर्षांपासून घर बांधताहेत कारण त्यांच्या आत्ताच्या घरात पुरेशी जागा नव्हती. जागा कमी असल्याने लहान मुलांना स्वयंपाकघरात झोपावं लागायचं.
“अधुरी स्वप्नं आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगलं आयुष्य मिळण्याच्या आधीच ही मुलं निघून गेली,” हबिबा सांगतात.