काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रायपूर इथे सुरु असलेल्या अधिवेशनात राजकीय भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भाष्य केलं.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया म्हणाल्या, "1998 मध्ये मी काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळलं. माझ्यासाठी हा अतिशय सन्मानाचा क्षण होता. 25 वर्षात काँग्रेस पक्षाने यशस्वी वाटचाल केली. काही वेळेस आपल्या हाती निराशा आली. 10 वर्ष मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वात आपण देशवासीयांना स्थिर सरकार दिलं. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपण कटिबद्ध आहोत".
"2004 आणि 2009 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या विजयासह डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुशल नेतृत्वाने मला वैयक्तिक समाधान दिलं. भारत जोडो यात्रेच्या बरोबरीने माझ्या राजकीय कारकीर्दीचा शेवट झाला आहे. काँग्रेस पक्षासाठी भारत जोडो यात्रा अनेक दृष्टीने महत्त्वाची होती", असं त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, "सध्याचा कालखंड काँग्रेस पक्षासाठी, कार्यकर्त्यांसह देशासाठी आव्हानात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक संस्थेवर कब्जा करत आहेत. सध्याचा काळ देशातल्या लोकशाहीसाठी अतिशय धोकादायक असा आहे. भाजप राज्यघटनेची पायमल्ली करत आहे".
"विरोधी पक्षांच्या मुस्कटदाबीच्या बरोबरीने द्वेषभावना भडकावली जात आहे. भाजप देशात द्वेष पसरवत आहे. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि महिलांना लक्ष्य केलं जात आहे.
"मोठ्या संघर्षाचा असा हा कालावधी आहे. त्यामुळेच काँग्रेसवर मोठी जबाबदारी आहे. काँग्रेस फक्त राजकीय पक्ष नसून देशाची एकता, समानता अबाधित राखण्यासाठीचं व्यासपीठ आहे", असं त्यांनी सांगितलं.
गांधी यांचा रोख प्रामुख्याने पक्ष पुनर्बांधणी आणि तसंच शिस्तपालन या बाबींकडे असल्याचं दिसून आलं.
"येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. सगळ्यांनी शिस्त पाळली आणि पक्षाच्या हिताचे काम केले तर आपण चांगले काम करू, असा विश्वास सोनिया गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान आपल्या भाषणात सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, "काँग्रेसची पुनर्बांधणी व्हावी असं सगळ्यांनाच वाटत आहे. पण त्यासाठी आपली एकी आणि पक्षाचं हित महत्त्वाचं आहे. तसंच स्वतःवर नियंत्रण आणि शिस्त त्याहून महत्वाची आहे.
2019 पासून मी हंगामी अध्यक्ष आहे. पण आता अध्यक्षीय आणि पक्षातील इतर निवडणुका लवकरच होतील. गेल्या दोन वर्षात आपण आपल्या तरुण सहाकाऱ्यांकडे नेतृत्व दिलं आहे. त्या सगळ्यांनी शेतकरी, महिला, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याक यांचे मुद्दे लोकांपर्यंत पोहचवले आहेत.
पक्षात मोकळेपणाने बोलणाऱ्यांचं आपण नेहमीच स्वागत केलं आहे. पण मीडियाच्या मार्फत बोलण्याची गरज नाही. आता आपण इथे खुली आणि प्रामाणिक चर्चा करू. पण या चार भिंतीच्या बाहेर जे काही सांगितलं जाईल त्यावर कार्यकारिणीचं एकमत असेल, असंही गांधी यांनी म्हटलं.
मोदी सरकारवर निशाणा
तीन काळ्या कायद्यांच्या माध्यमातून मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचा छळ.
अर्थव्यवस्था मोडकळीस आली, महागाई वाढली.
भाजपच्या कार्यकाळात गैर-भाजप राज्य सरकारांवर अन्याय.
लसीकरण धोरणावरही प्रश्नचिन्ह.
जम्मू काश्मीरमध्ये नुकतेच हत्यासत्र सुरू झालं आहे.
मोदींच्या कार्यकाळात शेजारी देशांसोबतचे संबंधही बिघडले आहेत.