फडणवीस यांच्याकडून नेतृत्व काढून घेतले जाईल: राऊत

गुरूवार, 26 जुलै 2018 (08:46 IST)
सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचे नेतृत्व काढून घेतले जाईल अशी भाजपत चर्चा आहे, असे विधान शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केले आहे. मराठा आंदोलन पुन्हा तीव्र झाले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जी स्थिती उद्भवली आहे, ती पाहता राज्यात नेतृत्वबदल केला जाईल, अशी चर्चा भाजपमध्येच रंगली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. 
 
‘महाराष्ट्रात जे चित्र आहे, ते राजकीय नेतृत्वाचे अपयश आहे. त्यातूनच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे या चर्चा महाराष्ट्रात रंगलेल्या नसून तर भाजपमध्येच रंगलेल्या आहेत, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे, असे राऊत म्हणाले.
 
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मात्र संजय राऊत यांचा दावा फेटाळला. राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. सरकार स्थिर आहे. पक्षातही कोणतीच नाराजी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री बदलणार ही शिवसेनेने पसरवलेली अफवा आहे, असे भांडारी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती