हृदयाच्या 2 शस्त्रक्रियांनी करुन दिली व्योमकेश बक्षीच्या कथेची आठवण
मंगळवार, 25 जून 2024 (14:21 IST)
व्योमकेश बक्षी हे नाव कानावरुन गेलं नसेल असा भारतीय माणूस सापडणं विरळाच. त्यातही दूरदर्शनच्या सुरुवातीचे दिवस ज्यांनी अनुभवले आहेत त्यांना व्योमकेश बक्षी या गुप्तहेराच्या कामावर आधारित मालिका पाहिल्याचं आजही आठवत असेल. लेखक शरदेंदू बंदोपाध्याय यांच्या कथांवर ही मालिका तयार करण्यात आली होती.
याच व्योमकेश बक्षी मालिकेत 'सही का कांटा' हा भागही आठवत असेल. यामध्ये मिलिंद गुणाजी यांनी देवाशिष नावाच्या व्यक्तीची भूमिका वठवलेली असते. त्यांचा विवाह दीपा (सुचित्रा बांदेकर) यांच्याशी झालेला असतो. मात्र दीपा यांचा पूर्वीचा प्रियकर देवाशिष यांच्यावर डार्ट गनने हल्ला करतो मात्र देवाशिष त्यात वाचतो. कारण देवाशिषचं हृदय उजवीकडे असल्यामुळे त्याचा मृत्यू होत नाही, अशी या भागाची थोडक्यात कथा आहे. ज्या बंगालमध्ये खरंतर पूर्व आणि पश्चिम बंगाल एकत्र असलेल्या बंगालमध्ये हे कथानक रचण्यात आलं होतं. त्याच बंगालमध्ये दोन अशा दुर्मिळ घटना समोर आल्या आहेत. कोलकात्यामध्ये दोन रुग्णांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यातील एक रुग्ण आजच्या बांगलादेशातील आहे.
सर्वसाधारण व्यक्तींच्या शरीरात हृदय डाव्या बाजूला असतं. पण, कोलकात्यामध्ये असे दोन रुग्ण आढळले ज्यांचं हृदय उजव्या बाजूला आहे. कोलकाता येथील दोन रुग्णालयात काही दिवसांपूर्वी हृदयाच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या दोन्ही शस्त्रक्रिया अतिशय दुर्मिळ होत्या, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. दोन्ही रुग्णांपैकी एक भारतीय, तर एक बांगलादेशी आहे.
बांगलादेशी महिलेचं फक्त हृदयच नाहीतर यकृत, फुफ्फुस, प्लीहा (डाव्या बरगडीच्या पिंजऱ्यातील एक छोटासा अवयव) आणि पोट हे सगळे अवयव देखील विरुद्ध बाजूला आहेत. असे रुग्ण 40 लाखांमध्ये एक असतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
कोलकात्याच्या रुग्णालयात या दोन्ही शस्त्रक्रिया झाल्या त्यांचे हृदयदेखील शरीराच्या उजव्या बाजूला होते. पण, हृदय आणि इतर अवयव विरुद्ध बाजूला असणं हा काही कुठला आजार नाही. बांगलादेशी महिलेचे सगळे अवयव हे जन्मापासूनच विरुद्ध बाजूला होते.
तर ज्या भारतीय रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यांचं हृदय हे टी. बी. झाल्यानंतर आपोआप डावीकडून उजवीकडे सरकलं. पण, या दोन्ही रुग्णांना आपलं हृदय नैसर्गिक जागेच्या विरुद्ध बाजूला असल्याची कल्पनाही नव्हती.
या रुग्णांवर अंदाजानं उपचार केले जात होते. एका रुग्णावर तर चुकीच्या पद्धतीनं उपचार करण्यात आले होते.
बांगलादेशी महिला रुग्णाच्या हृदयात उजव्या बाजूला दुखत होतं
मोना रानी दास ही महिला बांगलादेश इथल्या सातखीराच्या रहिवासी आहेत. त्यांना दोन वर्षांपूर्वी छातीच्या उजव्या बाजूला दुखत होतं. त्यामुळे हा अॅसिडिटीचा त्रास असावा असं कुटुंबीयांना वाटलं. पण, त्यांना काही दिवसांनंतर श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला.
त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा रुग्णालयात गेल्या असता अनेक चाचण्या केल्यानंतर त्यांचं हृदय उजव्या बाजूला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, असं मोना रानी दास यांची मुलगी विष्णूप्रिया दास यांनी बीबीसी बांग्लाला सांगितलं.
सध्या मोना रानी यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये हृदयाची शस्त्रक्रिया झाली असून त्या मुलीजवळ पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यात राहतात.
विष्णूप्रिया आपली आई मोना राणी यांच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती देताना म्हणाल्या, आम्हाला आतापर्यंत माहिती नव्हतं की फक्त हृदय नाहीतर शरीराचे इतर अवयव पण नैसर्गिक जागेच्या विरुद्ध बाजूला आहेत.
आम्ही सुरवातीला आईला कल्याणी इथल्या एका स्थानिक डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी बायपास सर्जरीसाठी कोलकातामधल्या मनिपाल हॉस्पीटल ब्राडवे इथल्या डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी यांच्याकडे रेफर केलं.
या रुग्णालयात मोना राणी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याबद्दल मनिपाल हॉस्पिटल ब्राडवेने सांगितलं, मोना राणी दास यांच्यावर गेल्या 24 मे पासून उपचार सुरू आहेत.
त्यांच्या अनेक चाचण्या केल्यानंतर आम्हाला समजलं की फक्त हृदयच नाहीतर शरीरातील इतर अवयव देखील विरुद्ध दिशेला आहेत. या परिस्थितीला डेक्स्ट्रोकार्डिया विथ साइट्स इनवर्सस (dextrocardia with situs inversus) म्हटलं जातं, तर फक्त हृदय विरुद्ध दिशेला असेल तर त्याला डेक्स्ट्रोकार्डिया (dextrocardia) म्हणतात.
विष्णुप्रिया यांना त्यांच्या आईच्या शरीराबाबत या विचित्र गोष्टी माहिती झाल्या तेव्हा त्यांना भीती वाटली.
त्या सांगतात, शरीरातील इतर अवयव विरुद्ध बाजूला असल्यानं आम्हाला काहीही फरक पडला नाही. पण, हृदय उजव्या बाजूला होते हे ऐकून आम्हाला धक्का बसला. पण, डॉक्टरांनी काळजी करू नका, बायपास शस्त्रक्रियेनंतर आई ठीक होईल, असं सांगितलं
नमाज पठण करताना शुद्ध हरपली
मोना रानी यांच्याशिवाय आणखी एक रुग्ण रेजाउल करीम यांच्यावरही हृदयाची दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया झाली.
करीम हे पश्चिम बंगालमधील उत्तर 24-परगणा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांच्या उजव्या बाजूला असलेल्या हृदयात शस्त्रक्रिया करून पेसमेकर लावण्यात आलं. मेडिका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली.
करीम यांना काही वर्षांपूर्वी टी.बीने ग्रस्त होते. यावेळी त्यांचं हृदय डावीकडून उजवीकडे सरकरलं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं.
करीम शस्त्रक्रियेनंतर बीबीसी बांग्लासोबत बोलताना म्हणाले, मला बालपणापासून खेळण्याची आवड होती. पण, अनेकदा मला दम लागायचा आणि खोकला यायचा. तरीही याच परिस्थितीत मी तब्बल 25 वर्ष राजकारणात घालवले. त्यावेळीही धावपळ व्हायची. त्रास झाला की स्थानिक डॉक्टरांना दाखवायचो. त्यांनी लिहून दिलेलं औषध आतापर्यंत नियमित घेत होतो.
काही वर्षांपूर्वी अचानक अशक्त वाटू लागलं. काही पावलं चाललं तरी थकत होतो. माझी अवस्था पाहून मुलीनं विमानानं वेल्लोरला नेलं. तिथं अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी डॉक्टरांनी विचारलं की मी नियमित सेवन करत असलेलं औषध टी. बीच आहे का? स्थानिक डॉक्टरांनी हे औषध घेण्याचा सल्ला का दिला? असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले.
वेल्लोर इथल्या डॉक्टरांनी करीम यांच्यावर उपचार केले आणि सहा महिन्यानतंर पुन्हा बोलावलं. पण, या सहा महिन्यात त्यांची प्रकृती इतकी बिघडली की नमाज पठण करतानाही त्यांना दम लागायचा. अचानक श्वास घ्यायला त्रास व्हायचा. नमाज पठण करताना दोन ते तीन वेळा शुद्ध देखील हरपली होती. यावेळी सोबतच्या लोकांनी त्यांना घरी सोडून दिल्याचं करीम सांगतात.
करीम यांची मुलगी मोनालिसा यास्मीन या उपचारादरम्यान त्यांच्यासोबत होत्या. त्या सांगतात, "डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याआधी त्यांचं हृदय उजव्या बाजूला असल्याचं सांगितलं नव्हतं. पण, शस्त्रक्रियेला तब्बल 3 तास लागले. त्यानंतर अब्बाचं हृदय उजव्या बाजूला असल्याचं माहिती झालं.
डॉक्टरांसमोर मोठं आव्हान
भारत आणि बांगलादेश दोन्ही रुग्णांवर एकाचवेळी दोन रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, ही शस्त्रक्रिया डॉक्टरांसाठी मोठं आव्हान होतं.
मोना रानी यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. सिद्धार्थ सांगतात,"डेक्स्ट्रोकार्डियाच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणं अवघड असतं. कारण, आपण काम उजव्या हातानं करतो. तसेच एरव्ही शस्त्रक्रिया करताना रुग्णांच्या उजव्या बाजूला उभं शस्त्रक्रिया करतो. पण, या परिस्थितीत रुग्णाच्या डाव्या बाजूला उभं राहून शस्त्रक्रिया करावी लागली. ही बायपास सर्जरी होती. आम्हाला अनेक प्रक्रिया उलट्या कराव्या लागल्या.
रेजाऊल करीम यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून पेसमेकर लावणारे डॉक्टर दिलीप कुमार सांगतात, ज्या रुग्णांचं हृदय डाव्या बाजूला असतं त्यांच्यासाठी पेसमेकर बनवलं जातं. पण, या रुग्णाचं हृदय उजव्या बाजूला होतं. त्यामुळे कंडक्शन सिस्टम पेसिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून पेसमेकर लावण्यात आलं. आतापर्यंत जगात कुठेही या तंत्रज्ञानाचा वापर करूनही पेसमेकर लावल्याचं उदहारण नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
ते सांगतात, कंडक्शन सिस्टम पेसिंग हे तंजज्ञान अत्यंत गुंतागुंतीचं आहे. पण, सोप्या शब्दात सांगायचं तर पेसमेकरच्या सहाय्यानं हृदयाचे ठोके स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
दोन्ही रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या रुग्णांची प्रकृती आधीपेक्षा चांगली आहे. काही दिवसानंतर त्यांची आणखी तपासणी केली जाईल. त्यानंतर दोघांचेही हृद्य शस्त्रक्रियेनंतर सामान्य माणसारखे काम करते का? याचं निदान लागेल.
पोस्ता का कांटा
हृदय उजव्या बाजूलाही असू शकतं असं शास्त्रज्ञांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितलं होतं. पण, साहित्यकार शरदिन्दु बंधोपाध्याय यांनी पहिल्यांदाच ही घटना शजारुर कांटा (पोस्ता का कांटा) या कादंबरीत कथेच्या स्वरुपात सांगितली.
या कथेत भिकारी फागुरामचा मृत्यू होतो. त्याच्या हृदयात काटा गेल्यानं मृत्यू होतो. अशाचप्रकारे हृदयाला काटा टोचून आणखी तीन जणांची हत्या होते. त्यानंतर मारेकरी प्रवल गुप्त त्याचा चौथा मित्र देवाशीष भट्ट याला देखील मारण्याचा प्रयत्न करतो.
पण, देवाशीषचं हृदय उजव्या बाजूला आहे हे त्याला माहिती नव्हतं. त्यामुळे देवाशीष यातून वाचतो. यानंतर डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी यांनी मारेकऱ्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि प्रवल यात अडकला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
शरदेंदू बंदोपाध्याय यांनी गेल्या शतकात ही कथा लिहिली. पण, त्याच्या तीनशे वर्षांपूर्वीच शास्त्रज्ञांना हे कळलं होतं की हृदय उजव्या बाजूलाही असू शकतं.
मार्को सेवरिनो यांनी 1643 मध्ये डेकस्ट्रोकार्डिया चा शोध लावला होता. त्यानंतर जवळपास शंभर वर्षांनंतर मॅथ्यू बेली यांनी शरीरातील महत्त्वपूर्ण अवयव विरुद्ध बाजूला असू शकतात असं सांगितलं होतं. त्यालाच सायटस इनवर्सस (Situs inversus) असे नाव दिलं होतं.
हृदयासह पोटाच्या भागात असणारे सर्व अवयव, विरुद्ध बाजूनं असलेल्या स्थितीला 'डेक्स्ट्रोकार्डिया विथ सायटस इनवर्सस' म्हणतात. बांगलादेशी रुग्ण मोना रानी दास यांनाही हेच झालं होतं.
सायटस इनवर्सस ही एक दुर्मिळ घटना आहे. दर 10 लाखांपैकी एका व्यक्तीच्या शरीराची रचना अशी असू शकते. दुसरीकडे मोना राणी यांच्यासारखं सगळे अवयव विरुद्ध दिशेला असणारे 40 लाखांत एखादा रुग्ण असतो. पण, हृदय विरुद्ध दिशेला म्हणजेच उजव्या बाजूला असण्याची घटना दुर्मिळ नाही. जगभरात प्रत्येक 12 हजार गर्भवतींपैकी एखाद्या महिलेच्या बाळाचं हृदय डाव्या बाजूऐवजी उजवीकडे असतं.