राष्ट्रपती मुर्मुंचे अभिभाषण हा नारीसन्मान आणि आदिवासी परंपरेचा गौरव- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मंगळवार, 31 जानेवारी 2023 (11:35 IST)
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
"राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु संसदेच्या अधिवेशनाला पहिल्यांदाच संबोधित करतील. राष्ट्रपतींचं अभिभाषण हा संविधानाचा गौरव आहे. भारताच्या संसदीय प्रणालीचा सन्मान आहे. नारी सन्मानाचा क्षण आहे. महान अशा आदिवासी परंपरेच्या गौरवाचाही क्षण आहे", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
"एका नव्या वर्षात आपण कामकाजाला सुरुवात करत आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. आशा, उत्साहाचं वातावरण आहे. हा एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. केवळ खासदार नव्हे तर देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद क्षण आहे.
 
भारताच्या राष्ट्रपती यांचं पहिलं अभिभाषण आहे. गेल्या अनेक दशकांपासूनची परंपरा आहे की संसदेत कोणताही नवीन खासदार बोलायला उभा राहिला की सदन त्याचा सन्मान करतं मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्याचा आत्मविश्वास वाढेल असं वातावरण निर्माण करतात.
 
राष्ट्रपतीचंही पहिलं अभिभाषण आहे. सर्व खासदारांसाठी अतिशय उत्साहाचा क्षण आहे. आम्ही या कसोटीला पात्र ठरू असा विश्वास वाटतो", असं पंतप्रधान म्हणाले.
 
पंतप्रधान म्हणाले, "देशाच्या अर्थमंत्रीही महिला आहेत. त्या उद्या अर्थसंकल्प सादर करतील. सध्याच्या वैश्विक परिस्थितीत भारताच्या अर्थसंकल्पाकडे केवळ भारतीयांचं नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष आहे.
 
"दोलायमान अशा जागतिक परिस्थितीत भारताचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकाकरता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
 
"त्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करणारा संकल्प असेल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्री पुरेपूर प्रयत्न करतील याची मला खात्री वाटते.
 
भाजपच्या नेतृत्वात एनडीए सरकारचं एकच लक्ष्य आहे- इंडिया फर्स्ट, सिटीझन फर्स्ट. याच भावनेने आम्ही काम करत राहू. सर्वच खासदार अभ्यास करुन संसदेत आपली भूमिका मांडतील. देशाची ध्येयधोरणं निश्चित करण्यात संसदेची भूमिका महत्त्वाची असते".
 
Published By- Priya DIxit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती